इस्रायलच्या हल्ल्यांमुळे गाझापट्टीत अनेक भाग अक्षरशः बेचिराख झाले असून मदत छावण्यांमध्ये हजारो नागरिक आसरा घेत आहेत. त्यांच्या मदतीसाठी संयुक्त राष्ट्रांकडून मानवतेच्या दृष्टीने मदत पुरवली जाते. परंतु, ही मदत सशस्त्र टोळ्यांकडून लुटली जात असल्याचा आरोप संयुक्त राष्ट्रांनी केला आहे. गाझापट्टीत शिरतानाच शस्त्राच्या धाकावर प्रचंड लूट होत आहे. त्यामुळे पॅलेस्टिनी निर्वासितांसाठी दिली जाणारी ही मदत थांबवण्यात येत असल्याची घोषणा संयुक्त राष्ट्रांनी केली आहे.
नोव्हेंबरमध्ये लुटले 100 ट्रक
नोव्हेंबरच्या मध्यावर सशस्त्र टोळ्यांनी तब्बल 100 ट्रक लुटल्याची माहिती युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सी फॉर पॅलेस्टाइन रेफ्युजीचे प्रमुख फीलीपी लझ्झारैनी यांनी दिली. अशाचप्रकारची लूट 30 नोव्हेंबर रोजी करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा इस्रायलच्या हल्ल्यात किमान 6 नागरिकांचा मृत्यू झाला.