दिल्ली डायरी – हेमंत सोरेन यांचा ‘चमत्कार’

>> नीलेश कुलकर्णी, [email protected]

झारखंडच्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत बहुमत मिळवून झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी दिल्लीकरांना धोबीपछाड दिला. झारखंडमधली जनता गरीब जरूर आहे, मात्र ती स्वाभिमानी आहे. हेमंत सोरेन यांच्यावरील दडपशाही पाहणारा हासायलेंट व्होटरमतदानाच्या दिवशी झारखंडच्या स्वाभिमानासाठी बाहेर पडला. ‘रांची या कराची?’ असल्या भावनिक जाळय़ात तो अडकला नाही. त्यामुळेच हेमंत सोरेन हेचमत्कारकरू शकले.

झारखंडमध्ये आपल्या उद्योगमित्राला खनिजांच्या खाणी मिळाव्यात या हेतूने दिल्लीच्या महाशक्तीने गेल्या पाच वर्षांत हेमंत सोरेन यांचे सरकार पाडण्यासाठी सात वेळा ‘ऑपरेशन लोटस’चा प्रयोग केला, मात्र हेमंत यांनी तो सपशेल उताणा पाडला. हेमंत सोरेन टप्प्यात येत नाहीत हे लक्षात आल्यावर हेमंत यांना अटक करून तुरुंगात डांबले. त्यानंतर त्यांचे सरकार पाडण्याचा पुन्हा प्रयत्न झाला, मात्र तोही फेल गेला. हेमंत यांना अटक झाल्यानंतर मुख्यमंत्री बनलेल्या चंपई सोरेन यांना गळाला लावत झामुमोमध्ये मोठी फूट पाडण्याचा प्रयत्न झाला. तोही बोंबलला.

झारखंडच्या विधानसभा निवडणुका ‘उद्योगमित्रा’साठी जिंकणे अत्यावश्यक असल्याने भाजपने या निवडणुकीत कसलीही कसूर ठेवली नव्हती. धार्मिक ध्रुवीकरणाचे भाजपातले ‘मास्टरमाइंड’ आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा सरमा व मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे झारखंडच्या गल्लीबोळात प्रचार करत हिंडत होते. अनेक केंद्रीय मंत्री, विविध राज्यांतील भाजप नेते, कार्यकर्ते आयात करण्यात आले होते. या निवडणुकीत ‘रांची या कराची,’ हा वादही चिघळवला गेला, मात्र झारखंडच्या जनतेने त्याला धूप घातली नाही. बाबा बैद्यनाथ धाम असलेल्या देवघरमध्ये भाजपचा उमेदवार दारुण पद्धतीने हरला. याच देवघरमध्ये अमित शहा यांनी मुक्काम ठोकला होता, तर पंतप्रधानांचे विमानही इथेच खराब झाले होते. त्यामुळे त्यांना दोन तास विमानातच बसून राहावे लागले होते तेव्हा हा भाजपसाठी अपशकुन असल्याचे बोलले गेले होते. आता ते सत्यात उतरले आहे. छिन्नमस्ता देवीचे मंदिर असलेल्या तीर्थ रजरप्पा या ठिकाणीदेखील भाजप मित्रपक्षाच्या उमेदवाराचा सफाया झाला. हेमंत सोरेन यांच्यावर झालेल्या राजकीय अन्यायाचा बदला झारखंडच्या जनतेने घेतला. हेमंत यांच्याबद्दलची सहानुभूती त्यांच्या पक्षाने पद्धतशीरपणे एन्पॅश केली. झारखंड आपण जिंकलेच अशा आविर्भावात भाजप नेते वावरत होते. प्रत्यक्षात त्याचा फुगा फुटला. साम, दाम, दंड, भेदाच्या जोरावर सदासर्वकाळ राजकारण करता येत नाही. ‘ये पब्लिक है सब जानती है’ हा भाजपसाठी या निवडणुकीतून मिळालेला धडा आहे. बाकी आता उद्योगमित्राला कोणत्या तोंडाने सामोरे जायचे, या काळजीत सध्या दिल्लीतील महाशक्ती आहे.

एनएसयूआई ‘सात साल बाद’

काँगेसची विद्यार्थी आघाडी असलेल्या एनएसयूआयने ‘सात साल बाद’ दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीत आपला झेंडा फडकवला आहे. गेल्या सात वर्षांपासून डीयूवर भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने वर्चस्व निर्माण केले होते. या वर्चस्वाला काँगेसच्या विद्यार्थी आघाडीने सुरुंग लावला आहे. या निवडणुकीला महत्त्व प्राप्त होण्याचे दुसरे एक कारण म्हणजे, दिल्लीत दोन महिन्यांनंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने या निवडणुकीला महत्त्व आहे. शिक्षक संघ व अभाविपच्या माध्यमातून भाजपने आपले हातपाय आता सर्वदूर पसरले आहेत. त्यामुळेच कोणताही आगापिछा नसताना अभाविप ही जेएनयू व डीयू या दोन्ही विद्यापीठांत बलशाली ठरली. याच संघटनेचे कार्यकर्ते लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी मोठे सक्रिय असतात. काँगेसने भाजपच्या वर्चस्वाला दिलेला छेद त्यामुळेच महत्त्वाचा आहे. आम आदमी पार्टीची विद्यार्थी आघाडी असलेल्या छात्र संघालाही या निवडणुकीत प्रभाव टाकता आलेला नाही. दिल्लीत भाजपला मिळणारा 36 टक्के मतांचा आकडा जवळपास फिक्स आहे. या स्थितीत काँगेस व आपमध्ये आघाडी झाली नाही तर त्याचा थेट फायदा भाजपला होणार आहे. आपची मते काँगेसकडे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने शिफ्ट होत आहेत. ही आपसाठी चिंतेची बाब आहे. दिल्लीच्या निवडणुका एकोप्याने लढल्या तरच काँगेस व आप यांची डाळ शिजणार आहे, अन्यथा दिल्लीसारखे राज्य गमावण्याचा धोका आहे. अर्थात अभाविपचे वर्चस्व मोडीत काढत एनएसयूआयने सुरुवात तर झकास केली आहे हे नक्की.

प्रियंका गांधी आणि संसदेतील एण्ट्री

काँगेस नेत्या प्रियंका गांधी यांचा संसदेतील प्रवेशही चांगलाच गाजला. वायनाडमधून तब्बल चार लाख दहा हजार मतांनी गांधी घराण्याचा वारसा असलेल्या प्रियंका लोकसभेत पहिल्यांदाच पोहचल्या. यापूर्वीही त्या राजकारणात येतील, अशी चर्चा अनेकदा ऐकायला यायची, मात्र या ना त्या कारणामुळे त्यांचे राजकीय पदार्पण लांबणीवर पडत गेले, मात्र मध्यंतरी त्यांनी काँगेसमध्ये संघटनात्मक जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर बंधू राहुल यांच्या केरळमधील वायनाडमधून त्यांनी आपले नशीब अजमावले. आपल्या मातोश्री सोनिया यांच्याप्रमाणेच प्रियंका यांनी आपल्या संसदीय राजकारणाचा श्रीगणेशा दक्षिणेतून केला आहे. प्रियंका यांच्यावर त्यांची आजी इंदिरा गांधी यांची विलक्षण छाप असल्याचे बोलले जाते. इंदिरा गांधी हुबेहुब वाटाव्यात अशा त्या भासतात. लोकसभेत शपथविधीसाठी आल्यानंतर त्यांनी इंदिराजींना आवडणारी केरळची ‘कसावू साडी’ आवर्जून घातली होती. सेंट्रल विस्टाच्या प्रवेशद्वारावर बंधू राहुल गांधी यांनी, ‘स्टॉप, स्टॉप.. लेट मी टेक युअर फोटो’ म्हणत आपल्या लाडक्या बहिणीचे फोटो काढले. प्रियंका यांच्यानिमित्ताने गांधी घराण्याचे आता संसदेत तीन सदस्य झालेत. प्रियंका काही राजकारणात येणार नाहीत. त्या यशस्वी होणार नाहीत, असा अपप्रचार भाजपने गेल्या अनेक वर्षांपासून केला होता, मात्र गांधी घराण्याचा करिश्मा म्हणा की अजून काही, प्रियंका गांधी दणदणीतपणे संसदीय राजकारणात आल्या आहेत!