मेहकरपासून 45 कि.मी.अंतरावरील वाशीम जिल्ह्यातील लोणी येथे रविवारी श्री सखाराम महाराज पूण्यतिथी निमित्त यात्रोत्सवात 100 वा रथ उत्सव उत्साहात पार पडला. लोणी हे गाव संत सखाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पूनित झालेले गाव आहे. लोणी बुद्रुकला प्रती पंढरपूरप्रमाणेच भक्तांची रेलचेल असते. श्री.संत सखाराम महाराजांच्या 100 वा रथोत्सव सोहळ्याला रविवारी दुपारी 2 वाजता मोठ्या थाटामाटात सुरुवात झाली आणि रथोत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला.
सखाराम महाराजांच्या रथ परिक्रमेला रितीरिवाजाप्रमाणे विधिवत पूजाअर्चा सखाराम महाराज संस्थानचे विश्वस्त डॉ. सखा महाराज जोशी यांच्या हस्ते करण्यात आली. दुपारी 2 वाजता मंदिराभोवती रथ परिक्रमेला सुरुवात करण्यात आली. हा रथयात्रेचा उत्सव शके 1847 इ.स.1925 पासून मठाधिपती वै.रामकृष्ण नाना महाराज पाठक यांच्या कारकीर्दीत सुरू झाला असून आज त्या रथोत्सवाला तब्बल 100 वर्षे पूर्ण झाली आहेत.विदर्भ मराठवाड्यातून हजारो भाविक सखाराम महाराजांना बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी रथ ओढतात आणि नवस पूर्ण करतात. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शताब्दी रथोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
श्रींच्या रथाचा इतिहास
सखाराम महाराजांचे निस्सीमभक्त रामकृष्णपंत मंडलिक यांनी परभणी जिल्ह्यातील नृसिंह पोखर्णी येथील नामदेव पांचाळ नावाच्या कारागिराकडून हा प्रचंड तीन मजली आणि अतिशय सुंदर नक्षीकाम असेलेला लाकडी रथ तयार करून घेतला. ब्रिटिश काळात उपलब्ध असलेल्या दळण वळणाचे प्रमुख साधन असलेल्या पंचवीस बैलगाड्यांतून रथाचे सुट्टे भाग लोणीस आणून लोणी येथे श्रींच्या रथाची उभारणी करण्यात आली. जगन्नाथपुरी येथील रथ ज्या प्रमाने ओढतात त्याच प्रमाणे रथ परिक्रमेच्या वेळी रथाला दोरखंडाने बाधून भाविक रथ ओढून आपला नवस पूर्ण करतात.
रथ परिक्रमा मार्गावर रांगोळी फुलांची आरास
रथ परिक्रमा मार्गावर सखाराम महाराजांचे निस्सीम भक्त असेलेले जालना येथील कुलकर्णी कुटुंब हे मागील दोन पिढ्यांपासून रथ परिक्रमा मार्गावर सुंदर अशी रांगोळी स्वखर्चाने साकारत असतात.याही वर्षी सुंदर रांगोळी काढण्यात आली होती.तसेच भक्तगण श्रीनामाचा गजर करून रथावर रेवड्या उधळतात. रथासमोर सजवलेले अश्व अभंगाच्या ठेक्यावर थिरकत असल्याचा आनंद भक्तांनी घेतला. तसेच टाळमृदंगाचा गजरात बँड पथकेही बोलावण्यात आली होती.महाराजांचा रथातील प्रसन्न मुखवटा भक्त मंडळींना आकर्षित करतो. सखाराम महाराजांच्या पूण्यतिथी निमित्ताने शनिवारी हजारो भाविकांना एकाच पंगतीत महाप्रसाद वाटण्यात आला. या यात्रोत्सवात काल प.पू.माधवानंद महाराज(उमरखेड) व प.पू.सुरेश महाराज ब्रम्हचारी(उटी) यांची सुद्धा उपस्थिती लाभली. संस्थानचे प्रमुख डॉ. सखा महाराज जोशी,गोविंद महाराज जोशी व प्राचार्य कल्याण महाराज जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सेवेकऱ्यांनी यात्रा उत्सव यशस्वी मेहनत घेतली.