
2005 मध्ये शिवसेनेशी गद्दारी केलेल्या नारायण राणे यांची सभा उधळल्याच्या प्रकरणात शिवसेना नेते आमदार अनिल परब, मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव, बाळा नर यांच्यासह 48 शिवसैनिकांची सबळ पुराव्यांअभावी शनिवारी निर्दोष मुक्तता झाली. घटना घडून 19 वर्षे उलटल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने हा निकाल देत शिवसैनिकांना मोठा दिलासा दिला.
2005 मध्ये शिवसेनेशी गद्दारी करून बाहेर पडलेल्या नारायण राणे यांची प्रभादेवीच्या नागू सयाजी वाडीत सभा आयोजित केली होती. शिवसेनेचे मुखपत्र दै. ‘सामना’च्या कार्यालयासमोरच ही सभा घेतली होती. पक्ष सोडल्यानंतर नारायण राणे यांनी बेताल टीका सुरु केली होती. त्यावर शिवसैनिक संतापले होते. संतप्त शिवसैनिकांनी नारायण राणेंच्या निषेधार्थ घोषणाबाजी करून सभा उधळल्याचा आरोप पोलिसांनी केला होता. याप्रकरणी शिवसैनिकांविरुद्ध दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. शिवसैनिकांनी वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शने केल्याप्रकरणी पोलिसांनी पाच गुन्हे दाखल केले होते. त्यातील दै. ‘सामना’ कार्यालयाच्या परिसरातील आंदोलनाच्या गुह्यात शनिवारी सत्र न्यायाधीश आदिती कदम यांनी 48 शिवसैनिकांची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. यात विद्यमान शिवसेना नेत्यांसह सध्या शिंदे गट आणि मनसेत गेलेल्या तत्कालीन शिवसैनिकांचा समावेश आहे.
निर्दोष मुक्तता झालेले शिवसैनिक
अनिल परब, श्रद्धा जाधव, बाळा नर, बाळा नांदगावकर, सदा सरवणकर, रवींद्र चव्हाण, जितेंद्र जानवळे, विजय लोके, आत्माराम शिंदे, सदानंद परब, लक्ष्मण भोसले, राजू पेडणेकर, सुमित्रा पत्रे, राजेंद्र सूर्यवंशी, ज्योती भोसले, सुप्रिया नार्वेकर, स्वाती शिंदे, स्नेहल जाधव, मुकुंद पडयाळ, अजित कदम, संजय कदम, लता रहाटे, राजीव कोरी, नारायण काशीराम राणे, सुधा मेहेर, रागिणी मांजरेकर, वत्सला जाधव, हरिश्चंद्र सोलकर, अनिल राणे, वनिता इन्सुलकर, यशवंत जाधव, श्रीधर सावंत, हरिश्चंद्र कदम, सुनंदा सरकारे, श्रीधर शेलार, गोपीचंद भिलारे, सुगंधा शेटये, संजय भावके, चंद्रपालचत्रु चंडेलिया, भावेश मथुरिया, सुभाष जाधव, विक्की दुर्गावाले, जयश्री मतवंडकर, अनुसया महपती, रजनी मिस्त्राr, सरिता इंगळे, धनंजय कांबळे, दीपक मोरे. (काही आरोपी मृत)
सबळ पुराव्यांचा अभाव; साक्ष विश्वासार्ह नाही!
आरोप सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षाने चार साक्षीदार तपासले. सर्व साक्षीदार पोलीस कर्मचारी होते व त्यांची साक्ष विश्वासार्ह वाटली नाही. याव्यतिरिक्त एकही स्वतंत्र साक्षीदार तपासलेला नाही. पोलिसांनी घटनेची व्हिडीओग्राफी सादर केलेली नाही. घटनास्थळाचा पंचनामा सिद्ध झाला नाही. 2022 पासून या खटल्यात 38 सुनावण्या झाल्या. नवीन न्यायाधीश आदिती कदम यांनी हे प्रकरण तत्परतेने निकाली काढले. खटल्यात शिवसैनिकांच्या वतीने ज्येष्ठ वकील अनिल पार्टे, अॅड. गिरीश सावंत, अॅड. मेराज शेख, अॅड. प्राची पार्टे, अॅड.राजेंद्र शिरोडकर, अॅड.अर्चित साखळकर, अॅड.नंदकुमार शेटये यांनी काम पाहिले. सर्व आरोपींतर्फे बाजू मांडताना ज्येष्ठ वकील अनिल पार्टे यांनी पोलीस तपासातील त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणल्या.
नेमके आरोप काय?
नारायण राणेंची सभा उधळण्यासाठी संतप्त शिवसैनिक नागू सयाजी वाडीकडे चालले होते. त्यावेळी पोलिसांनी अडवले असता आंदोलक शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. याप्रकरणी पोलिसांनी शिवसैनिकांविरुद्ध बेकायदेशीर जमाव करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत जमावबंदीच्या आदेशाचा भंग करणे, सरकारी कर्मचाऱयांना इजा पोहोचवणे आदी आरोपांखाली गुन्हा दाखल केला होता.