फंगल चक्रीवादळाचा चेन्नईला तडाखा, विमानतळ सात तास बंद; रस्ते पाण्याखाली

तामीळनाडूची राजधानी चेन्नईला शनिवारी ‘फंगल’ चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. ‘फंगल’ वादळामुळे चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ दुपारी साडेबारा ते सायंकाळी सातपर्यंत बंद ठेवण्यात आला. सोसाटय़ाच्या वाऱयामुळे काही ठिकाणी झाडे कोलमडून पडली. चेन्नईतील अनेक रस्ते जलमय झाल्याचे दिसले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सकाळपासून परिस्थितीचा आढावा घेत होते.

चक्रीवादळामुळे चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ दुपारी साडेबारा ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आला. खबरदारीचा उपाय म्हणून तिरुवरूर, कुड्डालोर, नागपट्टिनम आणि मयिलादुथुराई या ठिकाणी शाळांना सुट्टी देण्यात आली. तामीळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी विविध ठिकाणी भेटी देत परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या. गरज नसेल तर लोकांनी घराबाहेर पडू नये, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या. फंगलचा प्रभाव रोखण्यासाठी पोलीस, पालिका कर्मचारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी, नौदल कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.