दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, सुरक्षा व्यवस्था भेदून अंगावर ज्वलनशील पदार्थ फेकला

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर आज हल्ल्याचा प्रयत्न झाला. दिल्लीतल्या मालवीय नगर परिसरात केजरीवाल यांची पदयात्रा चालू असताना एका व्यक्तीने सुरक्षा व्यवस्था भेदत केजरीवालांच्या जवळ जाऊन त्यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ (स्पिरिट) फेकले. त्याच्या हातात काडीपेटीदेखील होती. अरविंद केजरीवाल यांना जिवंत जाळण्याचा त्या इसमाचा प्रयत्न होता. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे.

ग्रेटर कैलास विधानसभा मतदारसंघातील सावित्रीनगर परिसरात अरविंद केजरीवाल यांची पदयात्रा चालू होती. या पदयात्रेला हजारोंच्या संख्येने लोक जमले होते. यामध्ये महिला, वृद्ध, लहान मुलं व तरुणांची मोठी संख्या होती. केजरीवाल यांना पाहण्यासाठी, भेटण्यासाठी गल्लीबोळात लोक जमले होते. त्याचवेळी केजरीवाल यांच्यावर हल्ला केला. मी स्वतः त्यावेळी केजरीवाल यांच्याबरोबर होतो. माझं जॅकेटदेखील त्यावेळी भिजले. त्याने आमच्या अंगावर पाण्यासारखा द्रवपदार्थ फेकल्यानंतर मी व केजरीवालांनी वास घेऊन पाहिले. आम्ही वासावरून ओळखले की हे स्पिरिट होते, अशी माहिती ‘आप’चे प्रवक्ते व मंत्री सौरभ भारद्वाज यांनी पत्रकार परिषदेत दिली.

केजरीवाल यांच्यावर सलग तीन हल्ले

याआधी विकासपुरीमध्येदेखील केजरीवाल यांच्यावर हल्ला झाला होता.  शुक्रवारी बुराडीमध्ये हल्ला झाला. आज त्यांच्यावर तिसरा हल्ला झाला. मात्र पोलीस त्यांच्या सुरक्षेकडे लक्ष देत नाहीत, असे भारद्वाज म्हणाले.