पुरवठा रखडवणाऱ्या कंपनीलाच ‘बेस्ट’कडून बाराशे डबलडेकर बस पुरवण्याचे कंत्राट, इलेक्ट्रिक एसी बस घेण्याचे प्रस्तावित

‘बेस्ट’ने सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये प्रशासन 1200 इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बस खरेदी करणार आहे. मात्र याआधी 200 गाडय़ा पुरवण्याचे कंत्राट देऊनही केवळ 50 गाडय़ाच देणाऱ्या ईव्हीईवाय कंपनीलाच हे कंत्राट देण्यात आले आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षात बेस्टला पुरेशा गाडय़ा कशा मिळणार असा सवाल निर्माण झाला आहे. शिवाय बेस्टने 2100 एकमजली इलेक्ट्रिक बसगाडय़ा घेण्यासाठी कार्यादेश दिले असून यातील 205 गाडय़ा मिळाल्याचे प्रशासनाकडून अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आले आहे.

‘बेस्ट’ उपक्रमात सध्या 3166 बसगाडय़ा आहेत. यातील 1085 गाडय़ा बेस्ट उपक्रमाच्या स्वतःच्या मालकीच्या आहेत. यातील 510 गाडय़ांचे आयुर्मान पुढील वर्षात संपणार असून बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या केवळ 575 गाडय़ा उरणार आहेत. या पार्श्वभूमीवर बेस्टकडून नव्या गाडय़ा घेण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. बेस्टच्या बसेसचा एकूण बस संख्या 2027 पर्यंत दहा हजारांवर नेण्याचे बेस्टचे उद्दिष्ट आहे. मात्र बेस्टची आर्थिक स्थिती आणि कंत्राटदारांची दिरंगाई पाहता या बस कशा मिळणार असा सवाल निर्माण झाला आहे. आता कार्यादेश दिलेल्या ईव्हीईवाय कंपनीला काही महिन्यांपूर्वी 200 बस पुरवण्याचे कंत्राट दिल्यानंतर केवळ 50 गाडय़ा देण्यात आल्या. यामुळे बेस्ट प्रशासनाने वारंवार नोटीस बजावूनही गाडय़ांचा पुरवठा केला जात नसल्यामुळे आता हीच पंपनी 1200 दुमजली एसी गाडय़ा कशा देणार असा सवाल निर्माण झाला.

टॅप इन टॅप आऊट, डिजिटल बस प्लॅटफॉर्म

  • बस सेवा बळकट करण्यासाठी व फेऱया वाढवण्यामध्ये सुधारणा करण्यासाठी टॅप इन टॅप आऊट डिजिटल बस प्लॅटफॉर्म योजनेची अंमलबजावणी सुरू करण्याचे नियोजन अर्थसंकल्पात करण्यात आहे. स्वयंचलित प्रवासी भाडे आकारणी व डिजिटल प्रणालीचा वापर करून प्रवाशांचा अनुभव वाढवणे हे या योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.
  • डिजिटल बस प्लॅटफॉर्मच्या मुख्य घटकांमध्ये टॅप इन टॅप आऊट, ड्रायव्हर कन्सोल, बस निरीक्षकाकरिता ऑडिट मोबाईल अॅप, व्हिडीओ ऑडिट मोबाईल अॅप, व्हिडीओ ऑडिट आणि कॅमेरा यांचा समावेश आहे. या डिजिटल उपाययोजनेची अंमलबजावणी केल्यामुळे कार्यक्षम आणि पर्यावरणस्नेही आधुनिक बस तिकीट वाहतूक व्यवस्था मुंबईकरांसाठी उपलब्ध होईल, असे बेस्टने अर्थसंकल्पात म्हटले आहे.