>>अनंत देशमुख
तरुण कविमित्र संकेत म्हात्रे याचा ‘तिथे भेटूया, मित्रा’ हा 82 कवितांचा संग्रह. अन् त्याची अर्पणपत्रिका… ‘स्वप्नात येणाऱया माझ्या आईला, कवितेसारखं चिरंतन जगणाऱया माझ्या आजीला, दोन घरांना सांधणाऱया माझ्या बहिणीला आणि ब्रह्मांडाशी बोलणाऱया माझ्या बायकोला.’ संग्रहाची ही ‘अर्पणपत्रिका’ संकेतवरील समृद्ध संस्कार स्पष्ट करणारी आहे.
आजची मराठी कविता नेमकी कुठल्या टप्प्यावर आहे, या तरुण कवींचे अनुभवविश्व कसे आहे, आविष्काररूपांचे स्वरूप काय आहे आणि हे कवी अनुभवांची कशी निवड करतात, त्यांचे अनुभव हे अंगभूत असतात की पाश्चात्य कवितांचा वरचष्मा त्यांच्यावर असतो, ते ज्या प्रतिमा वापरतात त्या आपल्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनपद्धतीचा अपरिहार्य भाग म्हणून येतात की नावीन्याचा, मॉडर्निटीचा दिखाऊपणा त्यात दिसतो हे सारे समजून घेण्याचा माझा प्रयत्न चालला होता. पहिली गोष्ट ही जाणवते की, संकेतची कविता स्वतंत्र आहे. आठवणींच्या आणि अनुभवांच्या कितीतरी पैलूंचे चित्रण त्याने अतिशय नजाकतीने केले आहे. एका बाजूला हे लेखन दाट भावनात्मक तपशिलाने ओथंबलेले आहे, त्याच वेळी त्याने आपल्याला आश्चर्यवत वाटावे अशा प्रतिमात्मकतेची गुंफण सफाईदारपद्धतीने केलेली आहे. कवितेत कमालीची चित्रमयता आणि रसमयता यांचा प्रत्यय तो देतो.
संग्रहातील पहिलीच कविता ‘वैकुंठ’ या शीर्षकाची आहे. कवितेत निवेदक एक अपेक्षा व्यक्त करीत आहे. एक शुभंकर घटना घडावी असे त्याला वाटते. ती म्हणजे ‘चोख्याच्या नजरेतून अमृताने निथळावे वैकुंठाचे द्वार.’ आता शीर्षकच ‘वैकुंठ’ आहे. म्हणजे हा कवी नास्तिक नाही. त्याला चैतन्यतत्त्वाची जाणीव आहे आणि त्या वैकुंठीचे दार चोख्याच्या नजरेतून अमृताने निथळावे असे त्याला वाटते. इथली ‘चोख्याची नजर’ हा शब्दप्रयोगही अर्थपूर्ण वाटतो. ज्याने समाजाकडून हालअपेष्टा आणि अवहेलना भोगली, त्या चोख्याची करुणा तितकीच खोल असणार यात शंका नाही.
आपले सारे सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ संकेतने ‘आजी ः कवितेची ओळ’ या कवितेत सांगितले आहेत,
भूतकालीन शेणानं सारवलेल्या ओसरीपासून
वर्तमानकाळाच्या व्हरांडय़ापर्यंत चालत जाणारी
माझी आजी मृत्यूला जगण्याचं फूल
वाहत असते दर पहाटे…
आजीच्या ताज्या आठवणींचे देठ,
उगवले आहेत आमच्या संस्कृतीत
अशा रीतीने संकेत आजीपासून एक अतूट परंपरा स्पष्ट करीत जातो. त्यातील मधला धागा…
बाबा लिहीत असतात काहीतरी शहराबद्धल, कवींबद्दल, घरांबद्दल, स्वतःच्याच तुटत चाललेल्या आतडय़ांबद्दल…
हे एक टोक आपल्यापर्यंत कसे येते ते स्पष्ट करताना तो लिहितो,
आजीची कातडी मी जपून ठेवली आहे, माझ्या कवितेत
रोज तिची एक सुरकुती काढून
एक कविता लिहितो
‘सुभाष अवचटांचं घर’, ‘जीएंचं घर’ असे काही प्रतिभावंतांचे संदर्भ कवितांमधून आढळतात आणि मग कवी वास्तव आणि कल्पिताचे रंग किती बेमालूमपणे परस्परात मिसळतो हे पाहता येते. आईवरच्या कवितेत मांजराचा उल्लेखही असाच खुबीदारपणे आला आहे. प्रियेवरील कवितांमधून कवी प्रेमाची विविध रूपं आणि त्याच्या योजनेतील कल्पनावैविध्य आपल्याला आकर्षित करून घेते.
एकूण मानवी जीवनविषयक मूलभूत प्रश्नांची, माणसाच्या अस्तित्वाची आणि शरीर संवेदनांविषयीचे चिंतन या कवितेचा स्थायी भाव असल्याचे दिसून येते. या अर्थाने ही कविता अधिक अंतर्वक्र आणि आत्मकेंद्री असल्याचे जाणवते. कविता, काव्यप्रतिभा, काव्यनिर्मिती यांच्याविषयीही लिहीत जातो. ‘कविता लिहिल्यावर’, ‘कविता वाचण्याआधी’, ‘मी कविता लिहीत नसतो’, ‘कवितेशपथ’, ‘या ओळींवरून हात फिरवताना’, ‘कवींसाठी, काही प्रश्न’ या कवितांचं अवकाश पाहिलं तर कविमन काव्यविषयक चिंतनात किती गुंतून पडलं आहे याची साक्ष पटते. त्याची शब्दनिवडीची क्षमता मन थक्क करणारी आहे. ज्या कवितेवरून कवीनं संग्रहाला शीर्षक दिलं आहे, त्या ‘तिथे भेटूया, मित्रा’मध्ये निवेदक आपल्या समानधर्मी मित्राला साद घालत आहे. त्या दोघांत साधर्म्य आणि संवाद आहे. दोघांचे विषय समान असावेत.
शेक्सपिअर, तुकाराम, मॉनेट, मोजार्ट, न्यूटन हे वेगवेगळ्या प्रांतातील प्रतिभासंपन्न, त्यांचं समान जगण्याचं सूत्र, त्यांना हिरव्या जागेचा, शांततेचा सोस आणि सर्जनशीलतेचं आकर्षण हे इथलं समान सूत्र आहे . इथं ‘आदिम खूण’ मिळावी हा ध्यास, ‘झाडांच्या देठांना पुस्तकांची पालवी फुटावी’, दोघांना सारा देह ‘ओल्याचिंब अर्थांनी इंद्रधनुष्य वाटून’ घेता येईल आणि समानशील रसिक भेटायला येतील त्यांची खूण म्हणून काजवा चमकत राहील हे कवीचे स्वप्न आहे. हे सारे चित्र म्हणजे संवेदनशील मनात निर्माण झालेला यूटोपिया आहे.
वेगळ्या घाटाचा आणि वेगळ्या बाजाचा ‘तिथे भेटूया, मित्रा’ हा एक लोभस तरीही पथदर्शी काव्यसंग्रह तरुण कवींच्या काव्यात ‘विलक्षण आगळा-वेगळा’ ठरणारा आहे.
तिथे भेटूया, मित्रा
n कवी ः संकेत म्हात्रे n प्रकाशन ः अष्टगंध प्रकाशन
n पृष्ठे ः 146, n मूल्य ः 300/- रुपये.