भाजप मित्रपक्ष म्हणून गळ्यात हात घालतो आणि गळफास होतो! राजकीय विश्लेषकांचं मत

भाजपसोबत युती केल्यानंतर मित्रपक्ष संपतो, भाजपने केंद्रात जीएसटी आणून राज्यांची आर्थिक कोंडी केली, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. तसेच भाजप मित्रपत्रक्ष म्हणून गळ्यात हात घालतो आणि गळफास होतो, असेही मत राजकीय विश्लेषकांनी मांडले आहे.

लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रकाश अकोलकर यांनी आपली मतं मांडली. यात चर्चेत म्हटलं गेलं की, भाजपने पंजाबमध्ये अकाली दलसोबत मैत्री केली होती. आसाममध्ये असम गण परिषद, ओरिसात बिजू जनता दल, गोव्यात महाराष्ट्रावादी गोमंतक पक्षाचं झालं आणि महाराष्ट्रात शिवसेनेसोबत जे झालं हे जगजाहीर आहे. अकाली दलला आता नेतृत्व नाही. ओरिसामध्ये बिजू जनता दल हा सत्ताधारी पक्ष होता. त्याला दोन आकडीही जागा मिळाल्या नाहीत. गोव्यात भाजपने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी मैत्री केली होती. त्या पक्षाचं नावही आता लोकांना माहित नाही. भाजपने आधी जे शिवसेनेसोबत केलं ते आता मिंधे गटासोबतही करणार, असेही विश्लेषक म्हणाले. भाजप प्रेमाने गळ्यात हात घालतो आणि राजकीयदृष्ट्या त्याचा गळफास होतो हे देशपातळीवर सिद्ध झाले आहे, असेही मुद्दे या चर्चेत मांडले गेले.

राज्यांची आर्थिक कोंडी
भाजप केंद्रात आल्यानंतर जीएसटी कायदा आणला. त्यानंतर भाजपप्रणित केंद्र सरकराने सर्व राज्यांची आर्थिक कोंडी केली. जीएसटी आल्यानंतर राज्याचे अर्थमंत्री हे फक्त कारकून झाले आहेत, असे राजकीय विश्लेषकांनी म्हणाले. युपीए काळात गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी विरोध केला होता. मोदींनी ईव्हीएमलाही विरोध केला होता. जेव्हा मोदी सत्तेवर आले तेव्हा जीएसटीचा ढाचाच बदलला, असेही त्यांनी नमूद केले. लोकसत्ताच्या युट्युब चॅनेलच्या एका कार्यक्रमात पत्रकारांनी आपली मते मांडली.