>> प्रा. अनिल कवठेकर
केवळ पत्नी म्हणून स्रीचे अस्तित्व नसते तर ती एक व्यक्ती म्हणूनही तिचे स्वतंत्र अस्तित्व असते. हे अस्तित्व जपण्यासाठी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध उठाव करण्याची हिंमत तिने केल्याशिवाय तिला या कौटुंबिक हिंसाचारातून न्याय मिळणार नाही, असे सांगण्याचा प्रयत्न करणारा ‘दोन पत्ती’ हा चित्रपट आहे.
आपल्या भावाला सुधारण्यासाठी तुरुंगात पाठवणारी स्वतची काही तत्त्वे सांभाळून असणारी एक इन्स्पेक्टर. तिचे नाव आहे विद्या ज्योती (काजोल). तिचा बॉस तिच्याशी बोलत असतो तेव्हा लाइट येत-जात असते. विजेच्या या येण्या-जाण्यातून तिच्या आयुष्यातली नकारात्मकता चित्रित करण्याचा दिग्दर्शकांनी केलेला प्रयत्न थोडा वेगळा वाटतो. बॉस जेव्हा सकारात्मक बोलतो तेव्हा लाइट जाते. नकारात्मक बोलला की लाइट परत येते आणि हा विजेचा येण्या- जाण्याचा खेळ काही सेकंद चालूच राहतो. विद्या ज्योतीने स्वतचे काही नियम बनवलेले आहेत आणि ते ती पाळत असते. तिचे नियम स्वीकारायला कोणी तयार नसते. कुठलीही अॅडजस्टमेंट करायला ती तयार नसल्याने तिचे प्रमोशन अडकलेले असते. बॉस तिला सांगतो की, वादळामध्ये न वाकणारी झाडे कोलमडून पडतात. तेव्हा ती त्याला उत्तर देते, जी झाडे हवेच्या झोक्याबरोबर वाकतात ती कधीही सरळ उभी राहात नाहीत. या एका वाक्यावरून तिची स्वतची एक विचारधारा असल्याचे कळून येते. तिच्या या उत्तरामुळे तिचा बॉस तिला रात्रीच्या कडाक्याच्या थंडीत बाहेर पाठवतो.
फसना मेरी स्पेशालिटी है, कभी दरवाजे मे, कभी पोस्टिंग में, कभी पेट्रोलिंग मे, कभी हिंदुस्थान के पिनल कोड को समझने मे, कभी मां-बाप के उसूलो में… या संवादावरून विद्या ज्योतीच्या स्वभावाचा अंदाज येऊ शकतो. तिचे वडील जज आणि आई वकील होती म्हणून तिने वडिलांचा कायद्याचा मार्ग निवडलेला असतो. प्रत्येक वेळी ती फसते. आपण फसणार आहोत हे माहीत असूनही ती पुन्हा फसतेच.
एका केसच्या निमित्ताने विद्या एका ठिकाणी जाते. तिथे असणाऱ्या स्त्राrच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा दिसत असूनही ती काही झाले नसल्याचे सांगते. ती एक गोंधळलेली पोलीस इन्स्पेक्टर आहे, पण तरीही तिला केस सोडवायला आवडते. तिने एकदा तिच्या प्रियकराला मारलेले असते. म्हणून डॉक्टरांनी तिला राग शांत करण्यासाठी तू कादंबरी लिही असा सल्ला दिलेला असतो. पण तिला कादंबरी लिहिण्याचा कंटाळा असल्याने ती मोबाइलवर
रेकॉर्डिंग करत असते. सौम्या सूदच्या (क्रिती सेनन) घरातूनच ती तक्रार आलेली असते. त्या घरातील आया नंतर भेटून तिला सौम्याचा सर्व इतिहास सांगते. मीच कॉल करून तुम्हाला बोलावल्याचे सांगते. सौम्याला तुमची गरज आहे. ती कधीच सांगणार नाही, पण तिचा नवरा तिच्यावर अन्याय करतो. तिला मारझोड करतो. तिची एक जुळी बहीण आहे. तिचं नाव शैली. त्याच आयाने त्या दोघी बहिणी पाच वर्षांच्या असल्यापासून सांभाळलेल्या असतात. सौम्या हळवी असल्यामुळे आईच्या मृत्यूनंतर ढासळते. त्यामुळे तिला सगळ्यांची सहानभूती मिळते. दुसरी बहीण शैलीकडे कमी लक्ष दिले जाते आणि तिच्या मनात एक न्यूनगंड निर्माण होतो. ती सौम्याचे केस कापून टाकते म्हणून तिला हास्टेलमध्ये ठेवले जाते.
सौम्या तरुण झाल्यानंतर तिच्या आयुष्यात ध्रुव सूद येतो. तो तिला पॅराग्लायडिंग करण्यासाठी घेऊन जातो. ती त्याच्या प्रेमात पडते. सौम्या आपल्या कोषातून बाहेर पडत असताना तिची डॅशिंग जुळी बहीण शैली तिच्या आयुष्यात पुन्हा येते. सौम्या एकदम शांत, तर शैली अगदी डॅशिंग. तिच्या मनात आपल्या बहिणीविषयी तिरस्कार असल्याने तिला बहिणीचे सुख पाहवत नसते. ती ध्रुवला स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करते. ध्रुवसुद्धा शैलीच्या मादक रूपावर भाळतो आणि तिच्याकडे झुकू लागतो. शैली सौम्याला दुखावण्यासाठी, खिजवण्यासाठी, अपमानित करण्यासाठी तिलाच दोघांचे फोटो काढायला सांगते. हळूहळू दुबळ्या सौम्याचे प्रेम हिरावले जाते.
एकदा ध्रुवची एक महत्त्वाची मीटिंग चालू असताना शैली मोठय़ाने म्युझिक चालू करून त्याला आतमध्ये बोलावते आणि ज्या व्यक्तीबरोबर मीटिंग चालू असते त्यालाही चिअर्स म्हणते. त्यावेळी आया त्याला निवड करण्यात चूक करू नकोस असे सांगते. त्या क्षणी ध्रुवचा गोंधळ उडतो. शैलीच्या या वागण्यामुळे 500 करोडचे कॉन्ट्रक्ट त्याच्या हातातून जाते. बाप खडसावतो व त्याला एका चांगल्या मुलीबरोबर लग्न करायला सांगतो. ध्रुव सौम्याबरोबर लग्न करण्याचे ठरवतो. विवाह समारंभात शैली सौम्याप्रमाणेच कपडे परिधान करते आणि पार्टीमध्ये चर्चेचा विषय बनते. ही सगळी कथा आया इन्स्पेक्टर विद्या ज्योती सांगते. तेव्हा विद्या ज्योती तिला म्हणते की, जोपर्यंत सौम्या तक्रार नोंदवत नाही, तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही. आयाला ती पुरावे शोधायला सांगते.
ध्रुव जेव्हा क्लायंट त्यागीबरोबर पुन्हा एका प्रोजेक्टबद्दल घरात चर्चा करत असताना शैली स्वयंपाक करणाऱ्या सौम्यासमोर आपल्या प्रेमाचा उल्लेख करते. त्या रागात सौम्याकडून भाजीत मसाला जास्त पडतो. त्यागी हा मंत्री असतो. तो जेवण न करता निघून जातो. तेव्हा सौम्याला ध्रुव पहिल्यांदा मारहाण करतो. इथून ही कथा एक वेगळे रूप धारण करते. म्हणजे ही कथा दोन बहिणींच्या मत्सराची नसून एका सामान्य मुलीचा आपला संसार वाचवण्याची आहे. ती आपल्या नवऱ्याला सांगते की, इन्स्पेक्टरने तिला कंप्लेंट करायला सांगितलं आहे. ध्रुव सूद चिडून पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि सर्वांसमोर विद्या ज्योतीला धमकी देतो. न्याय द्यायला निघालेली विद्या ज्योती पुन्हा फसते. सतत गोंधळात पडणारी अशी ही व्यक्तिरेखा आहे.
सौम्या ध्रुवला पुन्हा एकदा पॅराग्लायडिंग करायला जाऊ या म्हणते. तो तिला होळीनंतर जाण्याचे वचन देतो. म्हणजे ज्या दृश्याने सिनेमा सुरू होतो ते दृश्य दिसते. दोघे पॅराग्लायडिंग करत आहेत आणि त्यांचे पॅराशूट काही कारणामुळे भरकटत जाते व हवेत हेलकावे खाऊ लागते.
ध्रुवसोबत बसलेली सौम्या जोरजोरात ‘मुझे बचाओ मुझे बचाओ…’ ओरडते. डोंगर रांगांमध्ये फिरणारे पर्यटक त्या प्रसंगाचा व्हिडीओ काढतात. शेवटी ते पॅराशूट एका पुलाजवळ अडकते आणि ते वाचतात. ध्रुवला अटक होते. सौम्या त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदवते की, तिला जीवे मारण्याचा त्याने प्रयत्न केला आहे. मग सुरू होतो कोर्ट ड्रामा, उलट तपासणी. सौम्याला न्याय मिळतो का? ती लढायला तयार होते का? हे प्रत्यक्ष पाहायला हवे.
तसे पाहिले तर केसचा निकाल लागल्यानंतर चित्रपट संपायला हवा होता. ही केस विद्या ज्योतीने लढवलेली असते, तिने आयुष्यात अनेक वेळा पराभवच पाहिलेला असल्याने विजयानंतर तिला संशय यायला लागतो की, नेमके काय घडले असावे? इतक्या सहजासहजी केसचा निकाल कसा लागला आणि तिला काहीतरी आठवते. विद्या ज्योती पुन्हा एकदा शोध घेते. सर्व बाबींचा शोध घेतल्यावर तिच्या हाती वेगळे धागेदोरे लागतात. ती ते सत्य पडताळून पाहते. चित्रपटाचा शेवटचा अर्धा तास हा प्रेक्षकांना दोन धक्के देतो. तिथेच न थांबता स्त्रियांवर होणाऱ्या घरगुती हिंसाचाराबाबत प्रत्येकाला त्याची जबाबदारी काय आहे तो सांगतो. घराघरातून होणाऱ्या महिलांवरील अत्याचाराबाबत आपली सामाजिक जबाबदारी काय आहे हे जर आपण वेळेवर ओळखले नाही तर एखाद्या महिलेचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे न्याय कशाला म्हणतात, जे पुरावे आहेत तो न्याय आहे की, त्या तितक्या पुराव्याच्या पलीकडे असणारे सत्य हा न्याय आहे का? हे विचार मांडत चित्रपट संपतो.
काजोलने यात वेंधळेपणा अचूकपणे पकडलेला आहे. ती करारी इन्स्पेक्टर नाही, तर वेगळी इन्स्पेक्टर आहे. काजोलकडून खूप अपेक्षा असणाऱयांना त्या पूर्ण न झाल्याचे वाटत असेल तर त्यांनी हा चित्रपट नीट पाहायला हवा. तेव्हा लक्षात येईल की, ही भूमिका तिने अगदी सहजतेने केलेली आहे. साहिल शेख हा ध्रुव सूदच्या भूमिकेत फारसा प्रभाव पाडत नाही. क्रिती सेननने दुहेरी भूमिकेत सौम्या आणि शैली यांची दोन्ही रूपे चांगल्या प्रकारे साकारली आहेत. दिग्दर्शक शशांक चतुर्वेदी यांनी चित्रपटाची परिणामकारकता वाढण्यासाठी संकलनावर थोडी मेहनत घेऊन चित्रपटाची लांबी कमी करायला हवी होती. हिमाचल प्रदेशातील उत्तराखंडमधले निसर्ग सौंदर्य दाखवण्यात दिग्दर्शक थोडा कमी पडला आहे. तरीही या कथानकाला वेगळ्या पद्धतीने मांडल्यामुळे हा चित्रपट एकदा पाहायला हरकत नाही.
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)