>> स्वप्नील साळसकर
पशुधनाचे संगोपन करताना शेण, गोमूत्रापासून जिवामृत तयार करून त्याचा वापर शेतात करणारे प्रशांत फाळके. त्यांचा विषमुक्त शेतीचे प्रयोग आणि जिवामृताचे कल्चर जैविक शेतीसाठी उपयुक्त आहेत. भाकड गायींच्या संगोपनातून साकारलेला हा उपक्रम जैविक शेतीतील आधुनिक आणि समाजोपयोगी प्रयोग म्हणायला हवा.
कृषी उत्पन्न वाढविण्याच्या स्पर्धेत ग्रामीण भागात रासायनिक खते, कीटकनाशकांचा अमाप वापर होऊ लागला. त्यामुळे मालाच्या शुद्धतेचा दर्जा ढासळला. मात्र आपल्या वडिलोपार्जित 20 एकर आंबा, काजू बागायतीत भाजीपाल्यासारखी अंतर्गत पिके घेताना शेतकरी सांभाळू न शकणाऱ्या 40 भाकड गाई घेऊन संगोपन करायचे आणि त्यांच्या गोमूत्र आणि शेणापासून जिवामृत तयार करून सिंधुदुर्गात विषमुक्त शेती केली जात आहे. प्रशांत फाळके या तरुणाच्या कृषी उत्पादनाला मागणीही तेवढीच आहे.
सिंधुदुर्ग जिह्यातील देवगड तालुक्यात आरे नरेवाडी भागात प्रशांत फाळके यांनी आपल्या आंबा, काजू बागायतीत हंगामी कृषी उत्पादन घेऊन भाजीपाला पिकवताना आर्थिक उत्पन्नाचे वेगळे स्रोत निर्माण केले. घरातील बुजुर्ग माणसांकडून शेती व्यवसायाचे धडे घेतलेल्या प्रशांत यांनी शेतातच अद्ययावत गोठा उभारला. पशुधनाचे संगोपन करताना शेण, गोमूत्रापासून जिवामृत तयार करून त्याचा वापर स्वत:च्या शेतात करण्यास सुरुवात केली. एवढय़ा मोठ्या जमिनीत सेंद्रिय खत कमी पडू लागले. म्हणता म्हणता त्यांच्या गोठ्यात आता 40 जनावरे झाली आहेत.
फाळके यांच्या विषमुक्त शेतीचा प्रयोग पाहण्यासाठी पंपोशीसह अनेक ठिकाणचे शेतकरी आवर्जून भेट देत आहेत. पाहणीसाठी आलेल्या शेतकरी बांधवांना फाळके जिवामृताचे कल्चर देत जैविक शेतीसाठी प्रोत्साहित करतात.
नव्वदीच्या दशकानंतर उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडलेली पिढी नोकरीधंद्यानिमित्ताने मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर यांसारख्या शहरांकडे वळली. ग्रामीण भागात कुटुंबातील सदस्य संख्या कमी झाली. काहींनी शेती करणे सोडून दिले. अलीकडच्या काळात पीक उत्पादन घेणे खर्चिकही झाले. घरात माणसेही कमी असल्यामुळे पॉवर व्हीलर, पॉवर ट्रिलर तसेच इतर आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून शेती केली जाऊ लागली. शेतकऱ्यांनी बैलजोडय़ा विकल्या. दुभती जनावरेही पाळण्याचे प्रमाण कमी झाले. अशा शेतकऱ्यांकडून गाई घ्यायच्या. त्यांचा सांभाळ करायचा. शेतातच शेण आणि गोमूत्र एकत्रित करून जिवामृत तयार करण्याचे काम फाळके करत आहेत. वेळोवेळी या पशुधनाची काळजीही तेवढय़ाच पद्धतीने घेतली जात असून गोठ्याची गायींची स्वच्छताही तशाच प्रकारे ठेवली जाते.
बागेतच अंतर्गत पीक घेताना कुवाळे, दुधी भोपळा, दोडका, काकडी, भेंडा, काटेकणगी यांसारखे विविध प्रकारच्या भाज्यांचे उत्पादन घेतले जात आहे. फाळके यांनी माळरान खरी भागातील सात ते आठ गुंठे जमिनीत प्रायोगिक तत्त्वावर ब्लॅक राईस भातशेती केली आहे. मणिपूर, मेघालय, आसाम राज्यांत हा तांदूळ मोठ्या प्रमाणात पिकतो. पहिल्याच शेतीत फाळके यांना उत्पादनाचा चांगला रिझल्ट मिळाला आहे. लोहाचे प्रमाण जास्त असलेला हा भात मधुमेहींसाठी पोषक आहे. फाळके यांच्या म्हणण्याप्रमाणे पूर्वी सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात शेणखताचा वापर केला जात असे. सद्यस्थितीत युरियाचा वापर भातशेतीत मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे रोपांची उंची वाढते. पिकाला नत्राचा पुरवठा जास्त होत असल्यामुळे कापणीअगोदरच पीक कोसळते. जमिनीवर केसर पडून दाण्यांचे नुकसान होते. म्हणूनच आम्ही शेतात पारंपरिक वालय, बेळा ही यांसारखी बियाणी वापरतो. त्यांचा वापर पुढील अनेक वर्षे शेतात होत राहणार आहे.
निसर्गाचा लहरीपणा, मनुष्यबळाची कमतरता यामुळे शेतीचे पडीक क्षेत्र दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मात्र शेती म्हणजेही प्रगती आहे हे तत्त्व लहानपणापासून जोपासले आणि सेंद्रिय शेतीवरच पूर्वीप्रमाणे भर दिला. कारण ती सध्या काळाची गरज आहे. कृषी उत्पादन मोठ्या प्रमाणात मिळू शकते. मात्र त्यासाठी जवळपास मोठी बाजारपेठ मिळायला हवी. एकावेळी जास्त उत्पादन झालेली भाजी स्थानिक बाजारांमधून विकल्यानंतरही शिल्लक राहत असल्यामुळे नुकसान होत असल्याची खंत फाळके यांनी व्यक्त केली.
वन्य प्राण्यांचा उपद्रव हा कायमचाच त्रासदायक ठरतो. मात्र त्यावरही पर्याय काढून कृषी क्षेत्राला मच्छीमारांकडून टाकाऊ असलेली जाळी विकत घेऊन कुंपण करायचे. माकड, कोल्हे, साळिंदर यांसह वन्य प्राण्यांना रोखण्यासाठी विविध प्रकारे बंदोबस्त करावा लागतो. बागायतीत वेगवेगळ्या प्राण्यांचे, माणसांचे आवाज असलेल्या ऑडिओ क्लिप्सचा वापर करून उद्घोषणा करणारी यंत्रणा बसवली असून उत्पादन राखण्यासाठी अशी शक्कल लढवावी लागत असल्याचे फाळके यांनी सांगितले.