मुंबईची महत्त्वाची जीवनवाहिनी असलेल्या ‘बेस्ट’ उपक्रमाला पालिकेने गेल्या पाच वर्षांत तब्बल साडेआठ हजार कोटींची मदत दिली असताना अजूनही या वर्षात 2812 कोटींची मागणी पालिकेकडे करण्यात आली आहे. नव्या बसेसची खरेदी आणि प्रशासकीय खर्चासाठी हा निधी वापरला जाणार असल्याचे समजते. बेस्टने परिवहन उपक्रमात 2132.52 कोटी तूट असलेला अर्थसंकल्प पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांना सादर केला. ‘बेस्ट’च्या या स्थितीवरून बेस्टचा आर्थिक डोलारा डळमळीतच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
‘बेस्ट’ने पालिका प्रशासकांना सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार 2025-26करिता अर्थसंकल्प ‘क’मध्ये विद्युत पुरवठा विभागाची शिल्लक 46.18 कोटी, विद्युत विभागाच्या भांडवली खर्चाकरिता वापरण्याचे प्रस्तावित केल्याने व रुपये 2132.26 एवढय़ा कोटींची परिवहन विभागाची अंदाजित महसुली तूट महापालिकेकडून अनुदान स्वरूपात मिळण्याच्या अधीन राहून 1 लाखाने अर्थसंकल्प अंदाज ‘क’ शिलकी सादर केला आहे. दरम्यान, या वर्षीच्या अर्थसंकल्पात पालिकेने बेस्टला 800 कोटींचे अनुदान देणे निश्चित केले असून यातील 600 कोटी आतापर्यंत दिले आहेत.
असे हवे आहे मदतीचे अनुदान
अर्थसंकल्पीय वर्ष 2025-26मध्ये परिवहन विभागाची एकूण तूट 2132.51 कोटी आहे. तसे आवश्यक किमान शिल्लक रुपये 1 लाख मिळून रुपये 2132.52 कोटी इतके अनुदान पालिकेकडून अपेक्षित आहे.
बेस्ट उपक्रमाच्या स्वमालकीच्या एकूण 510 बसगाडय़ांचे आयुर्मान संपत असल्यामुळे त्या मोडित काढून त्यांच्या जागी नवीन इलेक्ट्रिक वातानुकूलित 273 बस, 237 मिडी इलेक्ट्रिक वातानुकूलित बसगाडय़ा खरेदी करण्याचे प्रस्तावित केले आहे.
त्यामुळे संपूर्ण परिवहन विभागाच्या भांडवली खर्चामधील तफावतीकरिता 679.51 कोटी निधी असे एकूण एका वर्षांत 2831.03 कोटी इतके अनुदान पालिकेकडून बेस्टला मिळणे अपेक्षित आहे.
अशी केली मदत
वर्ष केलेली मदत
2019-2020 …………. 2150 कोटी
2020-2021 …………. 1117 कोटी
2021-2022 …………. 1266 कोटी
2022-2023 …………. 2631 कोटी
2023-2024 …………. 1428 कोटी
एकूण ……………. 8594 कोटी