प्रदूषणामुळे मॉर्निंग वॉकर्सना न्यूमोनिया, दम्याचा धोका, मुंबईतील रुग्णसंख्येत वाढ

मुंबईच्या प्रदूषण पातळीत चिंताजनक वाढ झाली आहे. या प्रदूषणाचा मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला असून श्वसनाशी संबंधित आजारांची रुग्णसंख्या वाढली आहे. सकाळच्या सुमारास प्रदूषण जमिनीलगत राहते. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर मॉर्निग वॉकर्सना न्यूमोनिया आणि दम्याचा त्रास जाणवत आहे. याबाबत तज्ञ डॉक्टरांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे.

गेल्या काही दिवसांत मुंबईच्या हवेचा दर्जा अत्यंत खराब झाला आहे. या प्रदूषित हवेमुळे शहर व उपनगरांत सर्दी, खोकला, न्यूमोनियाची रुग्णसंख्या वाढली आहे. वाढत्या प्रदूषणामुळे अनेकांना श्वासोच्छ्वास घेताना त्रास होत आहे. त्यांच्या फुप्फुसांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. हवेत प्रचंड धूलिकण आहेत. त्याचा सर्वच वयोगटातील लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आहे. सकाळी प्रदूषण जमिनीलगत राहत असल्याने रुग्णांमध्ये ‘मॉर्निग वॉकर्स’चे प्रमाण अधिक असल्याचे निरीक्षण तज्ञ डॉक्टरांनी नोंदवले आहे. प्रदूषणाचा स्तर जमिनीलगत असताना न चालण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.