दिल्लीत गँगस्टरराज; केंद्राच्या संरक्षणात बिष्णोई तुरुंगातून गँग चालवतोय, अरविंद केजरीवाल यांचा विधानसभेत घणाघाती आरोप

दिल्लीत गँगस्टरराज असून कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई तुरुंगातून त्याची गँग चालवतोय. तसेच त्याला भाजपप्रणीत केंद्र सरकारचे संरक्षण आहे, असा घणाघाती आरोप आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्ली विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान केला. गँगस्टर्सनी दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था धाब्यावर बसवली असून केंद्रीय गृहमंत्री केवळ बघ्याच्या भूमिकेत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

केंद्रात भाजपा सरकार असून दिल्लीच्या लोकांना सुरक्षा देत नाही. त्यांना सुरक्षा देण्याची जबाबदारी गृहमंत्री अमित शहा यांची होती परंतु, दिल्ली त्यांच्या नियंत्रणात नाही, असेही केजरीवाल म्हणाले. तर माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिल्लीला भाजपने शूटआऊट कॅपिटल बनवल्याचा आरोप केला. यापूर्वी शूटआऊट अॅट लोखंडवाला असे ऐकायला मिळायचे परंतु, दिल्लीत आता रोज हे ऐकायला मिळत आहे. शूटआऊट अॅट कबीर नगर, शूटआऊट अॅट पश्चिम विहार, शूटआऊट अॅट नारायणा, सोनिया विहार, हॉटेल सर्व ठिकाणी गँगस्टर्सचा दहशतवाद आहे, असे सिसोदिया म्हणाले.

भाजप आमदारांचा बहिष्कार

सभागृहात प्रश्नोत्तरांचा तास न घेतल्यामुळे भाजपा आमदारांनी गदारोळ केला. विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता यांनी सरकारने गेल्यावेळीही प्रश्नोत्तराचा तास घेतला नाही, त्यामुळे आम्हाला आवाज उठवता येत नाही, असा आरोप केला. नियम 280 अंतर्गत प्रश्नोत्तराचा तास घेतला नाही म्हणून भाजप आमदारांनी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार घातला.