बॅग ओढण्याच्या झटापटीत महिलेचा हात पकडणे हा विनयभंगाचा गुन्हा होऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने एका आरोपीला दोषमुक्त केले. अशा घटनेत अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवला जाऊ शकतो, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
एका विमान कंपनीतील सहाय्यक सुरक्षा व्यवस्थापकाने विनयभंगाच्या आरोपातून दोषमुक्तीसाठी याचिका केली होती. न्या. भारती डांगरे व न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. झटापटीत महिलेचा हात धरला गेला आहे. मात्र व्यवस्थापकाचा हेतू विनयभंगाच्या व्याख्येत येत नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.
काय आहे प्रकरण
मनोज दळवी यांनी ही याचिका केली होती. ही घटना घडली तेव्हा ते एका विमान कंपनीत काम करत होते. त्या वेळी एक महिला तिच्या कुटुंबासोबत कोचीहून अहमदाबादला जात होती. मुंबई मार्गे हा प्रवास होता. विमानतळावर एका बॅगेवरून महिला व दळवी यांच्यात झटापट झाली. या झटापटीत दळवीने महिलेचा हात पकडला. त्याने संतप्त झालेल्या महिलेने दळवी विरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदवला. या गुह्यातून दोषमुक्तीसाठी दळवीने न्यायालयाचे दार ठोठावले होते.
याचिकाकर्त्याचा दावा
घटना घडली तेव्हा मी माझे कर्तव्य पार पाडत होतो. मी केवळ महिलेच्या हातातून बॅग ओढली. मुळात ही बॅग तिची नव्हतीच. झटापटीत हात पकडणे हा विनयभंग होऊ शकत नाही. महत्त्वाचे म्हणजे विनयभंग करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मी केवळ हातातून बॅग ओढली, कोणत्याही प्रकारचा विनयभंग केलेला नाही, अशी साक्ष अन्य एका महिलेने दिली आहे. कायद्याचा चुकीचा अर्थ घेत महिलेने विनयभंगाचा गुन्हा नोंदवला, असा दावा याचिकाकर्त्याने केला.
महिलेचा युक्तिवाद
या गुह्याचे आरोपपत्र दाखल झाले आहे. याचा खटला पूर्ण होऊन निकाल लागायला हवा, असा युक्तिवाद करत महिलेने दळवीच्या दोषमुक्तीला विरोध केला. न्यायालयाने महिलेचा युक्तिवाद मान्य केला नाही.