>> श्रीप्रसाद पद्माकर मालाडकर
सुप्रसिद्ध पार्श्वगायिका सुधा मल्होत्रा यांच्या जन्मानंतर त्यांचे आई-वडील तत्कालीन भारताचा भाग असलेल्या लाहोरमध्ये वास्तव्याला होते. सुधा मल्होत्रा यांना लहानपणापासूनच गायनाची आवड असल्याने सहा वर्षांच्या असताना त्यांनी तत्कालीन सुप्रसिद्ध गायिका काननबाला यांच्या गाण्यांनी रंगमंचीय संगीत कार्यक्रमात गायला प्रारंभ केला. संगीतकार गुलाम हैदर यांनी सुधा मल्होत्रा यांना जाहीर संगीत कार्यक्रमात गाण्याची पहिली संधी दिली. त्यांचे ते गायन ऐकून आकाशवाणी लाहोर केंद्रात संगीत विभागाधिकारी उस्ताद फिरोज निजामी हे लहान मुलांच्या कार्यक्रमात बालकलाकार गायिका रूपात करारपत्राद्वारे आमंत्रित करू लागले. त्यांचे आकाशवाणी लाहोर केंद्रातले अनेक कार्यक्रम अल्पावधीतच रसिकप्रिय झाले.
सुधा मल्होत्रा अकरा वर्षांच्या असताना एका स्टुडिओमध्ये गात होत्या. हे सन 1950 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आरजू’ चित्रपटातले ‘मिला दे नैन’ हे गाणे होते. ध्वनिमुद्रण संपल्यावर या चित्रपटाचे संगीतकार अनिल विश्वास यांनी टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन दिले. त्यांना चित्रपटात पार्श्वगायनाची संधी अनिल विश्वास यांनी दिली. पुढे आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी गीतकार राजाराम- राजा बढे यांचे विनायक देवराव-व्ही. डी. अंभईकर यांनी संगीत दिलेले सुधा मल्होत्रा यांचे पहिले मराठी गीत ः ‘उघडी नयन रघुनंदन’ ताना, मुरक्या, हरकतींनी सजलेले आहे. हिंदी गीत ‘हंसो की पंखो’ याचे गीतकार पंडित नरेंद्र शर्मा, संगीत पंडित दिनकर कायकिनी आहेत. सुधा मल्होत्रा यांची गाजलेली गाणी असलेले हिंदी चित्रपट ‘आरजू’, ‘दिल्ली दूर नहीं’, ‘बरसात की रात’, ‘देख कबीरा रोया,’ ‘घर घर में दिवाली’, ‘काला बाजार’, ‘भाई बहन’, ‘कभी कभी’, ‘प्रेम रोग’ हे आहेत. ‘मिला दे नैन’, ‘ना मैं धन चाहूँ ना रतन चाहूं’, ‘ना तो कारवां की तलाश है’, ‘ये प्यार था या कुछ और था’, ‘तुम मुझे भूल भी जाओ, तो ये हक हैं, तुमको, मेरी बात और है, मैने तो मोहोब्बत की है’ आणि ही त्यांची काही अविस्मरणीय गाणी आहेत.
मुंबई दूरदर्शनच्या ‘आला हो श्रावण’ हा सुहासिनी मुळगांवकर निर्मित कार्यक्रमात. ‘बाई ही वैरीण झडीची रात्र.’ हे गाणे सुधा मल्होत्रा यांच्या आवाजात गाजले होते. मुंबई दूरदर्शन निर्मित आणि मधुराजा यांच्या ‘मैफिल’ या गझलच्या कार्यक्रमात हम है कुछ, अपने कुछ जमाने के लिये, तुम तो जमाने से निराली सजा देते हो, भुले न किसी हाल में आदाब ए नझर, जिंदगी तुझे मनाने निकले. ही सुधा मल्होत्रा यांनी गायलेली गाणी कालातीत आहेत.
या शिवाय तुम मेरी रखो लाज, भज मन राम, श्याम तेरी बंसरी, निस दिन बरसत ही त्यांची गाजलेली भजने आहेत. दर्शन दो घनश्याम (चित्रपट ः नरसी भगत), ना तो कारवा की तलाश है (बरसात की रात), मिल गये नैन (आरजू), आवाज दे रहा है कोई आसमान से (गौहर), गंगा की रेती पे बंगला (मिर्झा गालिब), मालिक तेरे जहाँ में (अब दिल्ली दूर नहीं), ओ रुक जा; लौट के आना होगा (चंगेझ खाँ), प्यार की चांदनी लेके रात आयेगी (पाक दामन) आज मुझे कुछ कहना है (गर्ल फ्रेंड), का से कहू मन की बात (धुल का फुल), झन झन बाजे मोरी पायलिया (लेडी ऑफ द लेक) ही त्यांची जुन्या हिंदी चित्रपटातील गाणी गाजली होती.
1960 मध्ये शिकागो रेडिओ मायक्रोफोन उद्योगपती गिरधर मोटवानी यांच्याशी त्यांचा विवाह झाल्यावर त्या सुधा प्रेमचंद मल्होत्राच्या सुधा गिरिधर मोटवानी झाल्या. लग्नानंतर त्या चित्रपटसृष्टीपासून दूर राहिल्या. अनेक वर्षांनंतर अचानक एका खासगी कार्यक्रमात अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते राज कपूर यांनी सुधा मल्होत्रा यांना एक गझल गाताना ऐकले, तेव्हा राज कपूर यांच्या आग्रहासाठी ‘प्रेम रोग’ चित्रपटासाठी गायल्या. ‘ये प्यार था, या कुछ और था’ हे गाणे आजही सुधा मल्होत्रा यांच्या आवाजातले स्वरमाधुर्य कायम असल्याचे प्रदर्शित करते. सुधा मल्होत्रा मोटवानी यांच्या कुटुंबात शिकागो रेडिओ या माईक उद्योगात त्या रमल्या आहेत. त्यांना भजन गायनाची आवड आहे. जरी त्या व्यावसायिक पार्श्वगायन करत नसल्या तरी या वयातही त्यांनी रियाझ सुरू ठेवला आहे. 2013 मध्ये केंद्र सरकारने पद्मश्री किताब प्रदान केला आहे. सुधा मल्होत्रा यांचा आज 88वा वाढदिवस त्यांचा सुश्राव्य स्वर कालातीत राहील,
(ज्येष्ठ प्रसिद्धी माध्यम तज्ञ आहेत.)