देशावर आलेले ‘ईव्हीएम’चे संकट मोठे आहे. गुलामीचा व दिवाळखोरीचा मार्ग ईव्हीएममधून जातो. त्यामुळे 95 वर्षांच्या बाबा आढावांनी लोकशाही रक्षणासाठी सुरू केलेला आत्मक्लेश देशाला जागे करणारा आहे. अण्णा हजारे झोपले आहेत. बाकी सगळेच विकले आहेत व उरलेले मोदी, शहा, अदानींचे गुलाम बनून ऐयाशी करीत आहेत म्हणून लोकशाहीचा दिवा विझताना पाहायचा काय? आज 95 वर्षांचे बाबा आढाव हाती क्रांतीची मशाल घेऊन उभे ठाकले आहेत. ठिणगी पडली, ठिणगीतून वणवा भडकेल. लोकशाही भट्टीतल्या पोलादाप्रमाणे तावून सुलाखून बाहेर पडेल. बाबा, आम्ही आपले आभारी आहोत. देशात नामर्दानगीची शेपटी तरारत असताना 95 वर्षांच्या बाबांनी एल्गार पुकारला आहे!
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी पुण्यात आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे. लोकशाही वाचविण्यासाठी ईव्हीएमविरुद्ध हा आत्मक्लेशाचा एल्गार आहे. बाबा आढाव यांचे वय आज 95 वर्षे आहे. बाबांची सारी हयात वंचित, कष्टकरी समाजाला न्याय मिळवून देण्याच्या लढ्यात गेली. हमाल, रिक्षावाले, मजूर यांच्या चुली पेटाव्यात म्हणून ते लढले. आता लोकशाहीचा दिवा विझत आहे, तो पेटत राहावा म्हणून ते आत्मक्लेश करून घेत आहेत. थंड लोळागोळा होऊन पडलेल्या समाजाला ही चपराक आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निकालाने सगळ्यांचीच झोप उडाली, पण ते सगळेच समाज माध्यमांवर लढे देत आहेत. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासारख्या नेत्यांनी ‘‘ईव्हीएम नकोच’’ अशी भूमिका घेतली, पण विरोधी पक्षाने घेतलेल्या अशा तोंडी भूमिकेला विचारतोय कोण? अदानींचे नाव घेतले तरी लोकसभा व राज्यसभेच्या अध्यक्षांना मिरची लागते व विरोधकांचे माईक बंद पाडतात. संसदेचे कामकाज गुंडाळल्याची घोषणा करतात. लोकशाहीचा हा चुराडा आहे. निवडणुका हा एक कळसूत्री खेळ झाला आहे. जोपर्यंत ईव्हीएम आहे, तोपर्यंत मोदी, शहा व अदानी हरणार नाहीत व लोकशाहीचा दिवा शेवटी विझून गेलेला आहे हे दिसेल. महाराष्ट्रातील निकालानंतर सगळय़ांनी आश्चर्य व्यक्त केले. ‘‘छे, छे, असे कसे निकाल लागले!’’ अशा शंका व्यक्त केल्या, पण विरोधकांत त्याविरोधात सामुदायिक कृतीचा अभाव दिसतो. महाराष्ट्रात प्रत्येक मतदान केंद्रावर जनतेचा विश्वास व
लोकशाहीचा खून
झाला. झालेले मतदान व प्रत्यक्ष मतमोजणीचा मेळ बसतनाही. मतदान संपल्यावर पाच ते साडेअकरा या काळात मतांची टक्केवारी सतत वाढत गेली. हा प्रकार चिंताजनक असल्याचे मत माजी निवडणूक आयुक्त कुरेशी यांनी व्यक्त केले. 76 लाख मते जास्त मोजली व त्यामुळे भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष विजयी झाले हे आता नक्की झाले, पण इतके होऊन देशात कोठे हालचाल नाही. मशिदीखाली मंदिरे आहेत यावर उत्तर प्रदेशात दंगली होतात व भाजपने लोकांना त्या धार्मिक विवादात अडकवून ठेवले, पण लोकशाहीचा गळा घोटला यावर कोणी उभे राहत नाही. 95 वर्षांच्या एका लढवय्याला हे सहन झाले नाही व तो शेवटी त्याची थकलेली गात्रे घेऊन मैदानात उतरला. बाबा आढाव यांचे आत्मक्लेश आंदोलन ही सुरुवात असेल तर सगळ्यात आधी ठिणगी पुण्यात पडायला हवी. बाबांच्या आंदोलन स्थळी जाऊन समर्थकांसह फोटोगिरी करण्याइतपत हे आंदोलन मर्यादित राहता कामा नये. देशाच्या स्वातंत्र्यासाठी पहिली देशव्यापी गर्जना पुण्यातूनच निनादली होती. ‘‘होय, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच!’’ असे पुण्यातून लोकमान्यांनी सांगितले व ब्रिटिश सरकारचे सिंहासन हलले. अनेक संकटांच्या छाताडावर पाय रोवून लोकमान्यांसारखे पुढारी ठामपणे उभे राहिले. त्या पुण्यात लोकशाही वाचविण्यासाठी 95 वर्षांच्या कार्यकर्त्याला शिवधनुष्य उचलावे लागते हे लोकशाही व स्वातंत्र्याचे दुर्दैव म्हणावे लागेल. महाराष्ट्राच्या निकालात अनेक घोटाळे झाले आहेत. भाजपचा विजय हा मारून मुटकून
प्राप्त केलेला विजय
आहे. त्यावर जनतेचा विश्वास नाही. जे उमेदवार पराभूत झाले त्यांना एका रांगेत सारखी मते मिळतात व भाजपचे जे विजयी झाले त्यांना दीड लाखाच्या मताधिक्याने सारखेच मतदान होते. ईव्हीएम सेट केल्याचा हा परिणाम. जगाने लोकशाही वाचविण्यासाठी ईव्हीएमचा त्याग केला, पण भारत हा एकमेव देश आहे, जो ईव्हीएमला कवटाळून बसला आहे. ज्याच्या हाती ईव्हीएम तोच लोकशाहीचा मालक अशी स्थिती भारतात निर्माण झाली आहे. स्वातंत्र्याचा हा अपमान आहे. पैशांतून मिळवलेला हा विजय लोकांना गुलाम करणारा आहे. धर्माची अफू पाजून लोकांना गुंगीत ठेवायचे व त्याच गुंगीत हवे तिथे बटणे दाबून घ्यायची. मोदी-शहा खरेच सच्चे व पक्के असतील तर मतपत्रिकेवर निवडणूक घेण्यास त्यांचे पाय का लटपटत आहेत? ते का घाबरत आहेत? देशावर आलेले ‘ईव्हीएम’चे संकट मोठे आहे. गुलामीचा व दिवाळखोरीचा मार्ग ईव्हीएममधून जातो. त्यामुळे 95 वर्षांच्या बाबा आढावांनी लोकशाही रक्षणासाठी सुरू केलेला आत्मक्लेश देशाला जागे करणारा आहे. अण्णा हजारे झोपले आहेत. बाकी सगळेच विकले आहेत व उरलेले मोदी, शहा, अदानींचे गुलाम बनून ऐयाशी करीत आहेत म्हणून लोकशाहीचा दिवा विझताना पाहायचा काय? आज 95 वर्षांचे बाबा आढाव हाती क्रांतीची मशाल घेऊन उभे ठाकले आहेत. ठिणगी पडली, ठिणगीतून वणवा भडकेल. लोकशाही भट्टीतल्या पोलादाप्रमाणे तावून सुलाखून बाहेर पडेल. बाबा, आम्ही आपले आभारी आहोत. देशात नामर्दानगीची शेपटी तरारत असताना 95 वर्षांच्या बाबांनी एल्गार पुकारला आहे!