>> तरंग वैद्य
मुंबईचे ‘अंडरवर्ल्ड’ हा सिनेनिर्मात्यांचा व प्रेक्षकांचाही आवडीचा विषय. राजकारण, निवडणुकांच्या पार्श्वभूमीची जोड, मुंबईचे अंडरवर्ल्ड आणि गँगवॉर असा मसाला असणारी, स्वार्थापायी माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो हे दर्शवणारे ‘मुर्शीद’ ही वेबसीरिज प्रेक्षकांची उत्कंठा वार्शीद पठाण… एकेकाळचा मुंबईचा डॉन, भाई. मुंबईच्या अंडरवर्ल्डचा सम्राट. आपल्या तरुण मुलाच्या मृत्यूमुळे तो हलतो. त्याला असे वाटते की, ही त्याच्या वाईट कृत्यांची त्याला मिळालेली शिक्षा आहे. तो भाईगिरीचे साम्राज्य आपल्या अनुयायाला फरीदला सोपवून धर्माचा मार्ग अवलंबतो, गरजूंची मदत करायला मागेपुबघत नाही आणि समाजात नाव कमावतो. डॉन असतानाही त्यांनी व्यवसायाची मूल्ये जपलेली असतात. ज्यांच्यावर अत्याचार होत आहेत, त्यांची पुयेऊन मदत केलेली असते. त्यामुळे निवृत्तीनंतरही राजकारण आणि व्यवसायात त्याचे एक गुडविल असते.
मूळ कथा सुरू होते फरीद या आजच्या मुंबईच्या अंडरवर्ल्डच्या डॉनच्या कार्यपद्धतीने. रक्कम देऊन ड्रग्सचा साठा तालिबान्यांकडून घेऊन येण्यासाठी फरीदचा सहायक महेश दोन नवीन तरुणांना सलीम आणि जुनैदला गोदीवर पाठवतो. इथे सलीम माल घेतो आणि तीनही आलेल्या इसमांना गोळ्या झाडून यमसदनी पाठवतो. हे बघून जुनैद प्रचंड घाबरतो आणि तडक महेशकडे येतो. महेश माल आणि पैसे दोन्ही गेल्याच्या रागात त्याचा आणि सलीमचा हा कट असल्याचे सांगून त्याला आततायीपणे मारतो. ही गोष्ट फरीदला कळते आणि तो तिथे येतो. जुनैदला बघून त्याच्या पायाखालची जमीन सरकते. कारण जुनैद मुर्शीद पठाणचा मुलगा असतो. मुर्शीद आता निवृत्त असला तरी त्याचे नाव अजून कायम असते आणि तो आपल्या मुलाला वाचवण्यासाठी काहीही करू शकतो याची फरीदला पुरेपूर जाणीव असते. पण तालिबान्यांचा म्होरक्या नबी नुकसान भरपाई आणि त्याच्या लोकांना मारणाऱ्या जुनैदला त्याला सोपवण्याच्या धमक्या देऊ लागतो. फरीदची अवस्था ‘इथे आड तिथे विहीर’ अशी होते आणि तो आपल्या एकेकाळच्या बॉसला डावलून तालिबान्यांची साथ द्यायचा निर्णय घेतो. अर्थातच ही गोष्ट मुर्शीदला कळते आणि आपल्या मुलाला वाचवण्यासाठी तो परत एकदा या अंडरवर्ल्डच्या दलदलीत उतरतो. मुंबईत परत एका गँगवॉरला सुरुवात होते.
मुंबईचे ‘अंडरवर्ल्ड’ हा सिनेनिर्मात्यांचा आवडीचा विषय. या गँगवॉरला एक भावनिक नातं देऊन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मुंबईतील अंडरवर्ल्डच्या शक्तीमागे राजकारण्यांचा हात आणि पोलिसांची साथ असते हे विदारक सत्य या वेब सीरिजमधून दर्शविले आहे. या कथेला राजकारण, निवडणुकांच्या पार्श्वभूमीची जोड आहे. सत्तेसाठी विशिष्ट वर्गाची मते कशी मिळवायची याची कसरत दाखवली आहे. स्वार्थापायी माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो हे दाखवले आहे.
हे सर्व नवीन नसले तरी ज्या पद्धतीने कथानकात पेरले आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे. गँगवॉर म्हटले की, हिंसा आलीच, पण त्याचा अतिरेक नाही ही जमेची बाजू आहे. अभिनयाबद्दल बोलायचे तर के.के.मेनन, झाकीर हुसेन, अनंग देसाई यांच्या सारख्या कसलेल्या कलाकारांनी मालिकेचा डोलारा यशस्वीरीत्या सांभाळला आहे. के. के. म्हणजे मुर्शीद हे समीकरण छान जमले आहे. झाकीर हुसेन पण उमदा कलाकार आहे. इथे त्याची भूमिका मोठी असून अभिनयालाही वाव आहे आणि प्रेक्षकांची प्रशंसा मिळेल असा अभिनय त्यांनी केला आहे. अनंग देसाईंची भूमिका लहान असली तरी ते छाप सोडून जातात. राजेश शृंगारपुरे यांनी पण आपल्या भूमिकेशी न्याय केला आहे. तनुज विरवाणी मुर्शीदचा दत्तक पुत्र आणि पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत ठीक. ‘मुर्शीद’ ही वेब सीरिज झी 5 वर असून याचे सात भाग आहेत. मुंबईतील गल्ल्यांमधील, वस्तींमधील चित्रीकरण मालिकेला खरेपण देऊन जाते.
(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)