देशाच्या जीडीपी दोन वर्षांतील सर्वात नीचांकी पातळीवर घसरली आहे. उत्पादन क्षेत्राच्या खराब कामगिरीमुळे चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत देशाची आर्थिक वाढ 5.4 टक्क्यांवर घसरली. शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत आर्थिक विकास दर 8.1 टक्के होता.
समोर आलेल्या आकडेवारीनुसार, 2022-23 या आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीची मागील नीचांकी पातळी 4.3 टक्के होती. यातच या वर्षी जुलै-सप्टेंबर या तिमाहीत चीनचा जीडीपी वाढीचा दर 4.6 टक्के होता.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयच्या (NSO) आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2024-25 च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत कृषी क्षेत्राची वाढ 3.5 टक्क्यांनी झाली होती, जी एका वर्षापूर्वी याच कालावधीत 1.7 टक्के होती. उत्पादन क्षेत्राचा विकास दर गेल्या तिमाहीत 2.2 टक्क्यांवर घसरला, तर वर्षभरापूर्वी तो 14.3 टक्क्यांनी वाढला होता.
आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या सात महिन्यांत केंद्राची वित्तीय तूट पूर्ण वर्षाच्या उद्दिष्टाच्या 46.5 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. शुक्रवारी सरकारी आकडेवारीत ही माहिती देण्यात आली. कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्सच्या (CGA) आकडेवारीनुसार, एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत वित्तीय तूट 7,50,824 कोटी रुपये होती. सरकारचा खर्च आणि महसूल यातील तफावतीला वित्तीय तूट म्हणतात. 2023-24 या आर्थिक वर्षातील याच कालावधीतील तूट अंदाजपत्रकाच्या 45 टक्के होती.