अचानक 76 लाख मतदान कसं वाढलं? निवडणूक आयोगाने जनतेच्या मतांवर डाका टाकला

विधानसभा निवडणुकीतील वाढीव मतदानावर काँग्रेसने संशय व्यक्त केला आहे. मतदानाच्या टक्केवारीत प्रचंड तफावत दिसत असून अचानक 76 लाख मतदान वाढलं कसं? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. संध्याकाळपर्यंत 58.22 टक्के मतदान होते, मग टक्केवारी साडेसात टक्क्यांनी वाढली कशी? कुठल्या मतदान केंद्रांवर रात्रीपर्यंत मतदान सुरू होते? अशी विचारणा करत त्याचे व्हिडीओ फुटेज निवडणूक आयोगाने द्यावेत अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.

नाना पटोले पुढे म्हणाले की, दुसऱया दिवशी सकाळी निवडणूक आयोगाने 66.05 टक्के मतदान झाल्याची माहिती दिली. म्हणजे 7.83 टक्क्यांची वाढ आयोगाने दुसऱया दिवशी कळवली. निवडणुका झाल्यानंतर निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन झालेल्या मतदानाबाबत माहिती देते अशी पद्धत आहे, परंतु निवडणूक आयोगाने कोणतीही पत्रकार परिषद घेतलेली नाही, असे पटोले यांनी सांगितले. जवळपास 76 लाख मतांची वाढ झाली आहे, ती नेमकी झाली कशी? असा सवाल त्यांनी केला.

कोणत्या मतदान केंद्रांवर रात्रीपर्यंत मतदान झाले

रात्री साडेअकरा वाजेपर्यंत मतदान झाले असे निवडणूक आयोगाच्या रिपोर्टवरून दिसते. म्हणजे मतदारांच्या रांगा दोन-तीन किलोमीटर लांबीच्या असतील. पारदर्शक निवडणुका व्हाव्यात म्हणून निवडणूक आयोग फोटोग्राफी, व्हिडीओ शूटिंग करतो. मग आयोगाने आम्हाला फुटेज द्यावेत. कोणत्या मतदान केंद्रावर हे मतदान झाले, अशी विचारणा करतानाच लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने लोकांची मते चोरायचे काम निवडणूक आयोगाचे नाही, अशी टीकाही पटोले यांनी केली.

60 तासांचे मतदान साडेसहा तासांत झाले

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषदेत आकडेवारी मांडत निवडणूक आयोगावर हल्ला चढवला. ते म्हणाले की, संध्याकाळपर्यंत 58.22 टक्के मतदान झाले होते. 65.02 टक्के मतदान झाले असे आयोगाने रात्री साडेअकरा वाजता सांगितले. एक मतदान करायला जवळपास एक मिनिट लागते. मग एक मिनिटाच्या हिशोबाने साडेसहा तासांत इतके मतदान व्हायला 60 तासांचा वेळ लागेल.

टक्केवारी कशी वाढली?

  • 20 नोव्हेंबर – मतदानाचा दिवस
  • सायं. 5 वा. – 58.22 टक्के
    रात्री 11.30 वा. – 65.02 टक्के
  • 23 नोव्हेंबर – मतमोजणीचा दिवस

एकूण मतदान 66.05 टक्के. म्हणजे 7.83 टक्के मतदान वाढले.

न्यायालयात जाणार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती यांनीही महाराष्ट्रातील मतदानावर संशय व्यक्त केला आहे असे सांगत त्यांचे वक्तव्य नाना पटोले यांनी या वेळी ऐकवून दाखवले. निवडणूक आयोगाने आता याचे उत्तर दिले पाहिजे अशी मागणीही पटोले यांनी केली. निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवरच यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणी काँग्रेस पक्ष न्यायालयात जाणार असल्याचेही पटोले यांनी सांगितले.