महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी महायुतीच्या नेत्यांची बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गुरुवारी रात्री पार पडली. या बैठकीत भाजपचा मुख्यमंत्री होईल यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच नव्या मंत्रिमंडळात शिंदे गट आणि अजित पवार गटाला उपमुख्यमंत्री पद देण्याचे ठरविण्यात आले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी चर्चा असली तरी गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता ते पुन्हा येणार की अजून कुणीतरी? याबाबतचा सस्पेंस कायम आहे. आता भाजपचे केंद्रीय निरीक्षक मुंबईत येतील आणि त्यांच्या उपस्थितीत होणाऱया बैठकीत भाजपचा विधिमंडळ पक्षाचा नेता कोण हे ठरविण्यात येणार आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर पुन्हा विराजमान होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी दिल्लीच्या दबावापुढे झुकत शर्यतीतून माघार घेतली. यानंतर फडणवीस यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात होते. पण आता चित्र काहीसे बदलल्याची स्थिती आहे. हरयाणा, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये मुख्यमंत्र्यांची निवड करताना भाजपच्या पेंद्रीय नेतृत्वाने वापरलेल्या धक्कातंत्राचा विचार करता मुख्यमंत्री म्हणून ऐनवेळी दुसरे एखादे नाव पुढे येण्याची शक्यताही आहे.
शिंदेंचा वजनदार खात्यांवर डोळा
राज्यात मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री अशी रचना असेल. नगर विकास, एमएसआरडीसी, गृह, आरोग्य, ग्रामविकास यासारख्या वजनदार खात्यांवर शिंदे गटाचा डोळा आहे. अर्थ, सहकार, महसूल, सार्वजनिक बांधकाम या खात्यांसाठी अजित पवार गट आग्रही असल्याचे समजते.
- 23 नोव्हेंबर रोजी राज्यात मतमोजणी झाली. दुपारपर्यंत भाजप आणि महायुतीला पूर्ण बहुमत मिळाल्याचे स्पष्ट झाले. त्याला पाच दिवस उलटूनही अद्याप मुख्यमंत्री कोण, याचा निर्णय होऊ शकलेला नाही.
- एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता असे सांगत शिंदे गटाने दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र दिल्लीतून दम मिळताच सूर बदलला आणि शिंदे यांनी गुरुवारीच निर्णयाचे सर्वाधिकार भाजप नेतृत्वाला दिले.
फडणवीस हसले, शिंदे फुगले!
देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू असताना एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाले आणि थेट अमित शहा यांच्या निवासस्थानी पोहोचले. शहा आणि शिंदे यांच्यात बंद दाराआड पाऊण तास चर्चा झाली. त्यानंतर शहांच्या निवासस्थानी तिन्ही पक्षांची बैठक झाली. या बैठकीचे फोटो समोर आले असून शहा फडणवीसांचे अभिनंदन करताना एका फोटोत दिसत आहेत. या फोटोत शिंदेही आहेत. त्यांचा रूसवा स्पष्टपणे चेहऱ्यावर दिसत आहे.
पक्ष नेहमीच नवीन नेतृत्व शोधतं चंद्रकांतदादांनी खडा टाकला
भाजप नेहमीच नवीन नेतृत्व शोधत असते. पक्ष हा प्रयोग त्या-त्या राज्यातील निवडणुकीचे तिकीट घोषित करत असताना करत असतो. नवीन नेतृत्व समोर आलं पाहिजे हा पक्षाचा कायम प्रयत्न असतो. हे आमच्या पक्षाचं वैशिष्टय़ आहे. त्यामुळे ते राज्यस्थान आणि मध्य प्रदेश प्रमाणे प्रयोग महाराष्ट्रात करणार आहेत की नाही हे मला माहिती नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
2 डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी
नव्या सरकारचा शपथविधी येत्या 2 डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. अमित शहा यांच्यासोबतच्या दिल्लीतील बैठकीनंतर भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक पुढील दोन दिवसांत महाराष्ट्रात पार पडेल. केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजप विधिमंडळ नेत्याची निवड होईल. यानंतर महायुतीची संयुक्त बैठक होऊन राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे. दरम्यान, शपथविधी सोहळय़ाचे ठिकाण अद्याप निश्चित झाले नसले तरी या सोहळय़ाची तयारी सुरू करण्यात आली आहे.
शहांना भेटण्याआधी फडणवीस अजितदादांच्या भेटीला
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीला जाण्याआधी देवेंद्र फडणवीस अजितदादांच्या भेटीसाठी सुनील तटकरे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले. अजित पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांच्या नावाला आधीच पाठिंबा दिला आहे.
- मंत्रिमंडळात भाजपचे सर्वाधिक मंत्री असतील. कारण भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मंत्रिमंडळात काही नवीन आमदारांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक दिग्गजांच्या जागी तरुण आमदारांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल, अशी अपेक्षा आहे.
- गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित आदींचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून नव्या मंत्रिमंडळात अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, संजय राठोड या वादग्रस्त मंत्र्यांना डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे.