बांगलादेशातील अन्सारुल्ला बांगला टीमच्या दहशतवाद्यांना पुण्यात आश्रय देणाऱया तिघा बांग्लादेशींना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने गुरुवारी पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. मोहम्मद हबिबूर रहमान हबीब ऊर्फ राज जेसब मंडल, हन्नन अन्वर हुसैन खान उर्फ हन्नन बाबुराली गाझी आणि मोहम्मद अझरली सुभानाल्लाह ऊर्फ राजा जेसब मंडल अशी दोषींची नावे आहेत.
विशेष न्यायालयाने तिन्ही दोषींना भारतीय दंड विधान तसेच विदेशी कायद्याच्या विविध कलमांखाली दोषी ठरवले. तिघांना पाच वर्षांच्या शिक्षेबरोबर प्रत्येकी दोन हजारांचा दंड ठोठावला. या प्रकरणात ऑक्टोबर 2023 मध्ये रिपेन हुसैन ऊर्फ रुबेल व मोहम्मद हसन अली मोहम्मद अमर अली या दोघांना न्यायालयाने दोषी ठरवले होते. वैध कागदपत्रांशिवाय अनेक बांगलादेशी नागरिक पुण्यात वास्तव्य करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या आधारे पुणे पोलिसांनी मार्च 2018 मध्ये गुन्हा दाखल केला होता. संबंधित घुसखोर बांगलादेशी ’अल-कायदा’शी संलग्न असलेल्या ’अन्सारुल्ला बांगला टीम’च्या दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले होते.