
शिवडीतील बीडीडी चाळींमध्ये विजेचा वापर वाढल्यामुळे रात्री-अपरात्री वीज जाण्याचा प्रकार वाढला होता. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून पॉवर हाऊसमध्ये जास्त क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला आहे. त्यामुळे वारंवार बत्ती गुल होण्याचा प्रकार थांबला असून 960 कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. बीडीडीतील रहिवाशांना याबद्दल शिवसेनेचे आभार मानले आहेत. शिवडी बीडीडी चाळ परिसरातील रहिवाशांकडून विजेचा वापर वाढल्यामुळे ट्रान्सफॉर्मर वारंवार बंद पडून वीजपुरवठा बंद पडत होता. यावर कायम स्वरूपी मार्ग काढण्यासाठी आमदार अजय चौधरी आणि माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी रहिवाशांसह पॉवर हाऊसची पाहणी केली. यावेळी ट्रान्सफॉर्मर हा 630 केडब्ल्यूचा असल्याचे आढळले. त्यामुळे त्या जागी जास्त क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसवल्यावर ही समस्या कायमस्वरूपी सुटेल, असे लक्षात आले. त्या दृष्टीने बेस्ट प्रशासनाशी पत्रव्यवहारही करण्यात आला होता. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून जुना 630 केडब्ल्यूचा ट्रान्सफॉर्मर बदलून त्या जागी नवीन 1000 केडब्ल्यूचा ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम सुरू करण्यात आले. हे काम आज पूर्ण झाले आहे. त्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारापासून कायमस्वरूपी सुटका झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील व्यत्यय टळला
वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रहिवाशांबरोबर विद्यार्थ्यांचेही मोठे नुकसान होत होते. याची गंभीर दखल घेत आमदार अजय चौधरी आणि माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी तातडीने पावले उचलत बेस्ट प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे बीडीडीसह परिसरातील विद्यार्थ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.