अंगणवाड्यांमधील एकतृतीयांशपेक्षा अधिक मुलांची वाढ खुंटली, मोदी सरकारची राज्यसभेत धक्कादायक माहिती

देशभरातील अंगणवाडय़ांमधील पाच वर्षांखालील मुलांमध्ये तब्बल एक तृतीयांशपेक्षा अधिक मुलांची वाढ खुंटल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महिला आणि बाल कल्याण राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना ही वस्तुस्थिती मांडली. अंगणवाडय़ांमधील मुलांची स्थिती मांडणारा अहवाल महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार शून्य ते सहा वयोगटातील मुलांची शारीरिक स्थिती चिंता वाढवणारी असल्याचे उघड झाले आहे. हीच बाब महिला आणि बाल कल्याण राज्यमंत्र्यांनी राज्यसभेत दिलेल्या माहितीवरून अधोरेखित झाली आहे. 

देशभरात अंगणवाडय़ांमधील पाच वर्षांखालील 7.54 कोटी मुलांची नोंदणी झाल्याचे पोषण ट्रकरच्या माध्यमातून समोर आल्याचे ठाकूर यांनी सांगितले. या मुलांपैकी 7.31 कोटी मुलांची किती वाढ झाली आहे याची पडताळणी करण्यात आली. त्यात तब्बल 38.9 टक्के मुलांची वाढ खुंटल्याचे आणि 17 टक्के मुलांचे वजन कमी भरल्याचे निदर्शनास आले, असे ठाकूर यांनी सांगितले.

पडताळणीतून गोष्टी आल्या समोर

मुलांची शारीरिक पडताळणी करण्यात आली तेव्हा मुलांच्या वयाच्या तुलनेत त्यांची शारीरिक वाढ योग्य प्रकारे झाली नसल्याचे समोर आले. त्याचबरोबर या मुलांचे वजन जितके हवे त्यापेक्षा कमी भरले. अशा मुलांची एपंदर शारीरिक वाढच योग्य प्रकारे होत नसल्याने आपोआपच त्यांच्या बौद्धिक पातळीवरही त्याचा परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.

2021 मध्ये सहा वर्षे वयापर्यंतच्या 16.1 कोटी मुलांपैकी 8.82 कोटी मुलांनी अंगणवाडय़ांमध्ये प्रवेश घेतला. या अंगणवाडय़ांमध्ये मुलांना योग्य पोषण मिळावं यासाठी सरकारची योजना आहे. परंतु मुलांना योग्य पोषण आहार मिळत नसल्याचे समोर आले आहे.

या मुलांपैकी 8.44 कोटी मुलांची शारीरिक पडताळणी करण्यात आली. त्यानुसार 37 टक्के मुलांची वाढ खुंटल्याचे समोर आले, तर 17 टक्के मुलांचे वजन कमी भरले. महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने याबाबतचा अहवाल आज प्रकाशित केला.

पोषण ट्रकर हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म असून त्याअंतर्गत अंगणवाडय़ांतील मुलांना पोषण आहाराच्या माध्यमातून योग्य पोषण मिळत आहे की नाही, याची पडताळणी केली जाते. त्यानुसार मुलांच्या पोषणाबाबत अनेक गोष्टी उघड होत आहेत.