आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा फैसला करण्यासाठी आयसीसीने आपल्या सर्व सदस्यांची शुक्रवारी तातडीची बैठक बोलावलीय. पण बैठकीआधीच पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) स्पर्धा आयोजनासाठी हायब्रिड मॉडेल (म्हणजेच हिंदुस्थानचे सामने पाकिस्तानबाहेर) कदापि शक्य नसल्याचे आयसीसीला स्पष्ट कळवले आहे. त्यामुळे व्हर्च्युअल बैठकीत हायब्रिड पर्यायावर चर्चा करण्यात वेळ न घालवता अन्य पर्यायांवर चर्चा करून निर्णय घ्यावा, असे पीसीबीने कळवले आहे.
येत्या फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी रंगणार असून या स्पर्धेत पाकिस्तानात खेळण्यास हिंदुस्थानी संघाने नकार कळवला आहे. त्यामुळे ही स्पर्धा अडचणीत सापडली आहे. तसेच पाकिस्ताननेही हिंदुस्थानचे सामने आणि अंतिम सामना तटस्थ देशात खेळविण्यास स्पष्ट शब्दांत विरोध दर्शवला आहे. हायब्रिड मॉडेलनुसार स्पर्धेचे आयोजन म्हणजे हिंदुस्थानला प्राधान्य दिल्यासारखे असल्याचे मत पीसीबीच्या सूत्राने व्यक्त केलेय.
चॅम्पियन्स ट्रॉफीत हिंदुस्थानने नकार दर्शविला तेव्हा पीसीबीने आयसीसीला पत्र लिहून विचारणा केली होती की, केंद्र सरकारने हिंदुस्थानी संघाला पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यास परवानगी दिली नसल्याचे पत्र दिले आहे का? आयसीसीच्या नियमानुसार जर कोणताही संघ सांगतो की त्यांच्या सरकारच्या आदेशानुसार दुसर्या देशात काही कारणास्तव खेळण्यास परवानगी देत नसेल तेव्हा त्या क्रिकेट मंडळाला आपल्या सरकारचे लेखी पत्र आयसीसीकडे जमा करावे लागते, पण या प्रकरणात असे काहीही घडले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आयसीसीच्या बैठकीत याप्रकरणी कोणत्या पर्यायाचा अवलंब आयसीसी करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.