प्रियकर व प्रेयसीमध्ये व्हॉट्सअॅपवर संवाद होत होता या आधारावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवता येत नाही, असा निर्वाळा देत उच्च न्यायालयाने प्रेयसीला दोषमुक्त केले.
या प्रेयसीच्या प्रियकराचा विवाह झाला होता. त्याचे प्रेयसीसोबत विवाहबाह्य संबंध होते. नंतर या प्रियकराने गळफास घेत आत्महत्या केली. पत्नीने प्रेयसीविरोधात आत्महत्येचा गुन्हा नोंदवला. हा गुन्हा रद्द करून या खटल्यातून दोषमुक्त करावे, अशी मागणी करणारी याचिका प्रेयसीने केली होती. न्या. मिलिंद जाधव यांच्या एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. प्रेयसीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा कोणताच पुरावा पोलिसांनी सादर केलेला नाही, असे न्यायालयाने नमूद केले.
प्रेयसीचा होता विवाहासाठी आग्रह
पतीच्या विवाहबाह्य संबंधांबाबत कळताच पत्नी प्रेयसीच्या घरी गेली. त्यानंतर प्रेयसीने प्रियकरासोबत संवाद बंद केला होता. काही दिवसांनंतर पत्नी व मुलाला सोडून दे आणि माझ्याशी लग्न कर, असा आग्रह प्रेयसीने केला. यास प्रियकराने नकार दिला. नंतर प्रियकराने आत्महत्या केली.
सत्र न्यायालयाने फेटाळला होता अर्ज
दोषमुक्तीसाठी प्रेयसीने सत्र न्यायालयात अर्ज केला होता. प्रेयसीविरोधात खटला चालवला जाईल, असे नमूद करत सत्र न्यायालयाने दोषमुक्ती नाकारली होती.