नवाब मलिकांनी केलेल्या बदनामीची सीबीआय चौकशीची मागणी, समीर वानखेडे यांची याचिका

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते नवाब मलिक यांनी केलेल्या बदनामीची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करणारी फौजदारी याचिका आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्याची दखल न्यायालयाने गुरुवारी राज्य शासनाला नोटीस जारी केली.

न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. या प्रकरणी वानखेडे यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याच्या तपास अधिकाऱ्याने सर्व कागदपत्रे घेऊन पुढील सुनावणीला हजर रहावे, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. यावरील पुढील सुनावणी दोन आठवडय़ांनी होणार आहे.

केस डायरी नीट ठेवत जा

 बहुतांश वेळा केस डायरीचे पेपर व्यवस्थित ठेवले जात नाही. त्यांची मांडणी नीट नसते. तसे न करता केस डायरी जरा नीट ठेवत जा, असे खंडपीठाने पोलिसांना बजावले.

काय आहे प्रकरण

मलिक यांचे जावई समीर खानला अटक केल्यानंतर मलिक यांनी माझी व माझ्या कुटुंबीयांची बदनामी सुरू केली. माझ्या जात प्रमाणपत्रावर प्रश्न उपस्थित केले. याचा मला व माझ्या कुटुंबीयांना नाहक त्रास झाला. माझ्यावर भाष्य करण्यास कोर्टाने मलिक यांना मनाई केली होती. तरीही मलिक हे माझी बदनामी करत होते. एससी, एसटी कायद्यांअंतर्गत गोरेगाव पोलीस ठाण्यात याची तक्रार करण्यात आली. गुह्याची नोंद करताना पोलिसांनी कठोर कलमे नमूद केली नाहीत. या तपासावर मलिकांचा दबाव आहे. याचा तपास योग्य प्रकारे होत नाही. स्वतंत्र तपास यंत्रणा किंवा सीबीआयकडून याचा तपास करावा, अशी मागणी वानखेडे यांनी याचिकेत केली आहे.