मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार, काही जिल्ह्यांत ‘हुडहुडी’ची लाट; खबरदारी घेण्याचा इशारा

मुंबई, ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे. मुंबईचे तापमान शुक्रवारी थेट 15 अंशांपर्यंत खाली घसरणार आहे. पुढील तीन दिवस तीव्र गारठय़ाचे असतील. काही जिह्यांत थंडीची लाट धडकेल. त्यामुळे नागरिकांनी वाढत्या थंडीपासून आरोग्य सांभाळण्यासाठी पुरेशी खबरदारी घेण्याचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे.

यंदा थंडी उशिराने दाखल झाली. नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत प्रतीक्षा करायला लावलेल्या थंडीचा जोर महिनाअखेरीस वाढला आहे. संपूर्ण राज्यभरात किमान तापमानात मोठी घसरण झाल्याने सर्वत्र शेकोटय़ा पेटायला लागल्या आहेत. पुढील तीन दिवसांत काही जिह्यांना थंडीच्या लाटेचा तडाखा सोसवा लागणार आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडणार असून मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टी भागात थंडीचा जोर वाढेल. धुळे, नाशिक, जळगाव या जिह्यात थंडीची लाट अधिक तीव्र राहील, असे वेधशाळेने म्हटले आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यात सर्वात कमी तापमान निफाडमध्ये 8.3 अंश इतके नोंद झाले, तर पुण्यात किमान तापमान 9.9 अंशांपर्यंत खाली घसरले. यात आणखी घसरण होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.

उत्तरेकडून येणाऱया शीतलहरींचा परिणाम

उत्तरेकडून हिमालयाच्या दिशेने येणाऱया शीतलहरींमुळे महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. कोरडय़ा वाऱ्यांचा परिणाम हवामानावर दिसून येत आहे. अनेक जिह्यांत कमाल व किमान तापमानात वेगाने घट होत आहे. विदर्भातदेखील गारठा वाढला आहे. गोंदिया, नागपूरमध्ये गेले दोन दिवस तापमान 11 अंशांच्या आसपास नोंद होत आहे. त्यामुळे जागोजागी शेकोटय़ा पेटू लागल्या आहेत.

कोकण रेल्वेला धुक्यामुळे लेटमार्क

कोकणातही थंडीचा जोर वाढला आहे. कोकण रेल्वे मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास दाट धुके पडत आहे. त्यामुळे मुंबईहून कोकण आणि गोव्याला जाणाऱ्या एक्प्रेसना लेटमार्क लागत आहे. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या जवळपास तासभर विलंबाने धावू लागल्या आहेत.

पुढील तीन दिवसांत मुंबईचे किमान तापमान 15 ते 16 अंशांच्या पातळीवर राहील. तापमानात सरासरीपेक्षा तीन अंशांची घट होईल. याचवेळी कमाल तापमानही घसरेल आणि मुंबईकर दिवसा गुलाबी थंडीचा सुखद अनुभव घेतील, असे हवामान खात्याने म्हटले आहे.