राज्यात मतदानाआधीच बोगस मतदारांची वाढली होती संख्या, तुळजापुरातील मतदार नोंदणी अधिकाऱ्याच्या एफआयआरमुळे सत्य उघड

राज्यात विधानसभा निवडणुकीचे धक्कादायक निकाल लागले. यावेळी ईव्हीएम मशिन्स हॅक करून मतांमध्ये हेराफेरी झाल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी केला. यातच आता आणखी एक धक्कादायक सत्य समोर आलं. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदारांनी मतदान केल्याची माहिती समोर आली आहे. मतदानाआधी महाविकास आघाडीने याबाबत निवडणूक आयोगात तक्रार ही केली होती. याच संर्दभातील तक्रार तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकारी अरविंद शंकरराव बोळंगे यांनी धाराशिव येथील सायबर पोलीस ठाण्यात केली होती, अशी माहिती समोर आली आहे.

मतदानाआधीच राज्यात बोगस मतदारांची वाढली होती संख्या

विधानसभा निवडणुकीत मतदानाआधीच राज्यात बोगस मतदारांची संख्या वाढली होती, अशी माहिती अरविंद बोळंगे यांनी नोंदवलेल्या तक्रारीतून समोर आली. पोलिसात नोंदवलेल्या तक्रारीत अरविंद बोळंगे म्हणाले आहेत की, ते 14 जून 2023 पासून तुळजापूर येथे तहसीलदारपदावर कार्यरत आहेत. निवडणूक काळात त्यांना मतदान नोंदणी अधिकाऱ्याची जबाबदारी देण्यात आली. मतदान नोंदणी अधिकारी म्हणून काम करताना मतदान नोंदणीसाठी आलेले ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज यावर निर्णय घेणे व अंतिम मजुरीसाठी मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी धाराशिव यांचेकडे पाठविणे हे कामकाज त्यांच्याकडे होते.

मतदार नोंदणी अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांना 2 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर या कालावधीत 1000 हून अधिक बोगस मतदार अर्ज अचानक आढल्याचं त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. निवडणुकीआधी निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीसाठी एक ऑनलाईन अॅप तयार केलं होतं. यात एका लॉगईन आयडीवरून जास्तीत जास्त पाच फॉर्म ऑनलाईन भरता येतात. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील नवीन मतदार यादीमध्ये नांव नोंदणीसाठी येणारे ऑनलाईन अर्जाचे प्रमाण अचानक वाढल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

अरविंद बोळंगे यांनी तक्रारीत पुढं म्हटलं आहे की, ऑनलाईन आलेल्या अर्जाची व्यवस्थित पडताळणी केली असता त्यामध्ये अनेक अर्जदाराचे अर्जासोबत जोडलेल्या आधार कार्डमध्ये नामांकन क्रम हा सारखाच आढळून आल्याचे दिसले. तसेच आधार कार्डवर डिजीटल सहीमध्ये दिनांक व वेळ एकसमान असल्याचे आढळून आले. आधारकार्ड वरील फोटो सारखेच असून त्यावरील व्यक्तीची नावे वेगवेगळी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

‘निवडणुकीत हेराफेरी करण्याचा प्रयत्न’

याशिवाय मतदार नोंदणी अधिकारी बोळंगे यांनी या नवीन मतदारांचे पत्ते तपासले असता, नमूद पत्त्यावर हे बोगस मतदार आढळले नाही. बोगस आधार कार्डे निवडणूक आयोगाच्या अधिकृत मोबाईल अॅप्लिकेशनचा वापर करून मतदार यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी तयार करण्यात आली होती. फसव्या मतदार नोंदणीचा ​​वापर करून निवडणुकीत हेराफेरी करण्याचा प्रयत्न केला जात होता, असंही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.