>> आत्माराम नाटेकर, ज्येष्ठ पत्रकार
मुंबई-गोवा (राष्ट्रीय महामार्ग – 66) या राष्ट्रीय महामार्गावरून दररोज हजारो खासगी प्रवासी गाडय़ा धावत असतात. गणेशोत्सव आणि सुट्टीच्या काळात या गाड्यांना अक्षरशः ऊत येतो. चार महिने अगोदर रेल्वेचे आरक्षण करूनही कन्फर्म तिकीट मिळत नसल्याने खासगी प्रवासी वाहतूक हाच एकमेव पर्याय आहे. गेली 14 वर्षे मुंबई-गोवा महामार्गाची परवड सुरूच आहे. कोकणी माणसाचे हाल आजही संपलेले नाहीत आणि भविष्यात संपतील याची ग्वाही कोणीच देऊ शकत नाही. खासगी वाहतुकीचे हे जाळे आता पार गोव्यापर्यंत पोहचले आहे.
पूर्वी एसटीची सेवा अत्यंत सुरक्षित आणि किफायतशीर होती. खेडय़ापाडय़ात फिरणारी ही लाल परी सदैव उपेक्षितच राहिली. एसटी महामंडळाला आजतागायत कोणी भक्कम वालीच मिळाला नाही. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे एसटी महामंडळाचे ब्रीदवाक्य आता नावापुरतेच राहिले आहे. गोरगरीबांच्या कल्याणासाठी अतिशय दुर्गम, खडकाळ, डोंगराळ भागात धावणाऱया या एसटीचे पूर्वीचे वैभव आता उरले नाही. त्यामुळे खासगी वाहतूकदारांचे चांगलेच फावले आहे. 50-50 लाखांच्या वातानुकूलित आणि स्लीपर कोच गाडय़ा आणि त्यांची भरमसाट दरवाढ हे आता नेहमीचेच दुखणे झाले आहे. एप्रिल -मे महिन्यात आंब्याच्या पेटय़ांनी झुकलेल्या गाडय़ा पाहून धडकी भरते. अडला हरी गाढवाचे पाय धरी आणखी काय?
बोरिवली, सीएसएमटी, ठाणे, परळ, लालबाग, डोंबिवली, कल्याण आदी ठिकाणांहून हजारो गाडय़ा आज प्रवासी वाहतूक करीत असतात. रामेश्वर ट्रव्हल्स, स्वामी रामेश्वर, वैभव, मुजावर, दीक्षिता, रोशन, श्री दुर्गा माऊली, पारिजात, साईपूजा, साई, साई मानेश्वर, सान्वी, प्रथमेश, श्री अंबाप्रसाद, आर्या, महालक्ष्मी, मनाली, समर्थ कृपा, सातेरी भावई, गावकर, जीवदानी, विशाल अशा हजारो गाडय़ा मुंबई-गोवा मार्गावर दररोज पळत असतात. दुपारी दोन-अडीचच्या दरम्यान मुंबईहून सुटलेल्या या गाडय़ा परळ, लालबाग, ठाणे, भांडुप, कुर्ला, ऐरोली आदी स्टेशन्स घेत रात्री दहा-साडेदहापर्यंत पनवेलबाहेर निघतात आणि पेणच्या अलीकडे असलेल्या मीलन हॉटेलला जेवणासाठी थांबतात. तिथून सुसाट निघालेल्या या गाडय़ा पहाटे अडीच-तीनच्या सुमारास संगमेश्वर-आरवलीदरम्यान इच्छित स्थळी थांबतात आणि मग दिवस उजाडण्यापूर्वी कणकवली-कुडाळ-मालवण आदी मुक्कामी पोहचतात. मुंबई-गोवा या महामार्गांवर आजवर 15 हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत, पण हा महामार्ग पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहे. रायगड जिह्यात या महामार्गाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. जनआक्रोश समितीने अनेक वेळा आंदोलने केली, पण परिस्थिती जैसे थेच आहे.
देशात डोंगर-नदीनाल्यांवर अवघड पूल, बोगदे आणि महाकाय रस्ते बांधणाऱया केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासारख्या कार्यक्षम नेत्याने हात टेकले तिथे राज्य सरकारचे काय?
खरी गोम पुढेच आहे. या महामार्गावरून धावणाऱया खासगी प्रवासी वाहतुकीचे थांबे नक्की झालेले आहेत. कोकणातून दुपारी दोन-अडीच वाजता सुटणाऱया या गाडय़ा मजल दरमजल करत कणकवलीला साडेपाच-सहा वाजेपर्यंत पोहचतात आणि सायंकाळी सात-साडेसातच्या दरम्यान राजापूरला चहापाण्यासाठी थांबतात. तिथून निघालेल्या गाडय़ा साडेनऊ-दहा वाजता संगमेश्वरदरम्यान थांबतात. पूर्वी एखाद्या हॉटेलला गाडय़ांची गर्दी असली की या खासगी गाडय़ा पुढे निघून जात आणि दुसऱया हॉटेलला थांबत. आता या खासगी थांबलेल्या गाडय़ा बाहेर पडेपर्यंत रस्त्यावर उभ्या राहतात आणि त्या बाहेर पडल्या की आपल्या गाडय़ा या हॉटेलला लावतात. खासगी प्रवासी गाडय़ांच्या ड्रायव्हरांनी या हॉटेल मालकांना एवढी माया कशी काय लावली हा प्रश्न पडतो. त्यांची ही वाढलेली जवळीक आर्थिक कारण आहे.
येथील हॉटेलला एका वेळी 35-40 खासगी बस थांबतात. म्हणजेच 40 ड्रायव्हर आणि 40 क्लीनर म्हणजे हे 80 जण येथे जेवणार अन् तेही विनामूल्य. हे हॉटेल मालक ड्रायव्हर आणि क्लिनर यांची पूर्वीपासूनच चांगली बडदास्त ठेवायचे. आता त्यांच्यासाठी स्पेशल रूम ठेवण्यात आली आहे. येथे त्यांना हवे ते जेवण मिळते आणि लक्ष्मीदर्शनही होते. येथील जेवणाच्या दर्जाची अन्न प्रशासनाने केव्हा तरी चाचपणी केल्यास बरेच काही हाती लागेल. पिढय़ान्पिढय़ा या मार्गांवरून जाणारे प्रवासी ‘मुकी बिचारी कुणी हाका’ म्हणत प्रवास करताहेत. मूग गिळून गप्प राहण्याशिवाय ते तरी दुसरे काय करणार?