Ratnagiri News – परप्रांतीय मासेमारी विरोधात मत्स्य विभागाने पावले उचलली, कर्नाटकची मच्छीमार नौका घेतली ताब्यात

परप्रांतीय मच्छिमार नौकांचा गेल्या काही महिन्यांपासून रत्नागिरीच्या समुद्रात वावर वाढला आहे. त्यामुळे मत्स्य विभागाने परप्रांतीय मासेमारी नौकांवर करडी नजर ठेवत कारवाई करण्यास सुरुवात केली असून कर्नाटकची मच्छिमार नौका मिरकरवाडा बंदरात पकडण्यात आली आहे.

कर्नाटकची अल बहर मच्छिमार नौका मिरकरवाडा बंदरात येत असल्याची माहिती मिळाली. सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त आनंद पालव यांच्यासह त्यांच्या परवाना अधिकार्‍यांनी तातडीने जावून ती नौका ताब्यात घेतली. बंदर बदलताना नौकेला परवाना घ्यावा लागतो. मात्र, कर्नाटकच्या नौकेने कोणतीही परवानगी न घेता राज्यच बदलले होते. त्यामुळे सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाने त्या नौकेला ताब्यात घेवून मिरकरवाडा बंदरात अटकावून ठेवले आहे. याप्रकरणी आता सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांकडे सुनावणी झाल्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे.

परप्रांतीय वेगवान मच्छिमार नौका रत्नागिरीच्या समुद्रात येवून घुसखोरी करत मासे पकडून नेतात. मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेने त्यांचा माग काढला तर त्या परप्रांतीय लोखंडी नौका मत्स्य व्यवसाय विभागाच्या फायबर गस्ती नौकेला धडक देण्यासाठी येतात. काही दिवसांपूर्वी परप्रांतीय नौकांकडून हा प्रयत्नसुद्धा झाला होता, असे सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त पालव यांनी मान्य केले. आता कर्नाटकची नौका चार दिवसांपासून अटकावून ठेवल्याने इतर परप्रांतीय नौकांनी धास्ती घेतली आहे. रत्नागिरी समुद्रात राज्याच्या सागरी क्षेत्रात अशा परप्रांतीय नौकांची गेल्या चार दिवसांपासून घुसखोरी कमी झाली आहे. स्थानिक मच्छिमारांनीही याला दुजोरा दिला आहे.