वायू प्रदूषणाची परिस्थिती पाहता दिल्ली-एनसीआरमध्ये 2 डिसेंबरपर्यंत गृप 4 निर्बंध लागू राहतील, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. फक्त शाळांना या बंदीतून सूट देण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. म्हणजेच कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंटच्या (CAQM) शिफारशीनुसार दिल्ली-एनसीआर मधील शाळा हायब्रिड मोडमध्ये चालत राहतील.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की, शाळांशी संबंधित उपाय वगळता, गृप -4 अंतर्गत सर्व निर्बंध 2 डिसेंबरपर्यंत लागू राहतील. दरम्यान, सिएक्यूएमला बैठका घेण्यास आणि गृप -4 वरून गृप -3 किंवा 2 मध्ये कसे जात येईल, याबद्दल सल्ला देण्यास सांगण्यात आलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ‘कोर्ट कमिशनर’च्या अहवालावरून असे दिसून येते की गृप -4 अंतर्गत निर्बंधांची योग्य अंमलबजावणी करण्यात अधिकारी पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. न्यायालयाने म्हटले आहे की, गृप -4 निर्बंध सुनिश्चित करण्यात गंभीर चुका करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
दरम्यान, गुरुवारी सकाळी दिल्लीतील प्रदूषणाची पातळी किंचित वाढली आणि हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत पोहोचली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) सकाळी 9 वाजता 313 नोंदला गेला. तर बुधवारी सकाळी 9 वाजता तो 301 होता. दिल्लीत धुक्याचा दाट थर कायम आहे.