हेमंत सोरेन चौथ्यांदा झारखंडच्या मुख्यमंत्रीपदी, ‘इंडिया आघाडी’च्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा

झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने मोठा विजय मिळवला आहे. यानंतर आता हेमंत सोरेन यांनी चौथ्यांदा झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी गुरुवारी संध्याकाळी 14वे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

शपथविधी सोहळ्यात इंडिया आघाडीची ताकद दिसून आली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आप नेते अरविंद केजरीवाल, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, तामिळनाडूचे उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आणि बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनीही शपथविधीला हजेरी लावली.

दरम्यान, झारखंड विधानसभा निवडणुकीत जेएमएमच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने 56 जागा जिंकल्या होत्या. झारखंड विधानसभेची एकूण सदस्य संख्या 81 आहे आणि बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा 41 आमदारांचा आहे. इंडिया आघाडीच्या संख्या बहुमतासाठी आवश्यक संख्येपेक्षा 15 ने अधिक आहे.