दिल्लीत काय चाललंय? अरविंद केजरीवाल यांचा थेट अमित शहांना सवाल

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या सुरक्षेवरून थेट केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाहा यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत केजरीवाल यांनी अमित शहा यांना परखड सवाल केले आहेत. दिल्लीत काय चाललंय? दिल्लीचे व्यवस्थापन करू शकत नाही, हे मान्य करणार का? दिल्लीतील लोकांनी सुरक्षेसाठी कोणाकडे जावे? महिलांना दिल्लीत सुरक्षित वाटते का? असे सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केले आहेत.

दिल्लीतील माता-भगिनी, मुली या सर्वांना मी विचारतो की, तुम्ही जेव्हा घराबाहेर पडता तुम्हाला सुरक्षित वाटते का? मेट्रोमध्ये जा किंवा बसमध्ये जा, संध्याकाळी सातनंतर मुलगी घरी पोहोचली नाही तर आई-वडिलांना चिंता होते की, मुलगी सुरक्षित असेल की नाही? हे आपले शहर आहे आणि आपल्या शहराच्या कोणत्याही कोपऱ्यात आपल्याला सुरक्षित वाटत नाही, असे केजरीवाल पुढे म्हणाले.

अमित शहा यांच्या घरापासून 10 किमी अंतरावर 11 ऑक्टोबर रोजी एका 34 वर्षीय महिलेवर गँगरेप झाला. ही महिला मृतावस्थेत आढळून आली. अमित शहा यांच्या घरापासून 8 किमी अंतरावर बेगमपूरमध्ये 12 सप्टेंबर रोजी तीन वर्षाच्या मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार करण्यात आला, अशा घटना सांगत अरविंद केजरीवाल यांनी अमित शहा यांच्यावर टीका केली.

वसंत विहारमध्ये स्फोट

वसंत विहारमधील बन्सीवाला स्वीटजवळ गुरुवारी सकाळी 11.47 वाजता स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांचे पथक, स्पेशल सेल, फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून घटनास्थळी तपास सुरू आहे.