निवडून येताच मिंधेंच्या चंद्रदीप नरकेंचा उन्माद, महाविकास आघाडीला साथ देणाऱ्या काकांच्या घराजवळ फोडले फटाके

करवीर विधानसभा मतदारसंघातून अगदी मोजक्या मतांनी विजयी झालेले मिंधे गटाचे नवनिर्वाचित आमदार चंद्रदीप नरके यांच्या विजयाचा किळसवाणा उन्माद आता समोर आला आहे. नरके ज्यांच्या बोटाला धरुन राजकारणात आले, ज्यांच्या बळावर दहा वर्षे आमदारकी तसेच साखर कारखान्याचे अध्यक्षपद भूषवले त्या आपल्या काकांच्या म्हणजेच 82 वर्षांच्या अरुण नरके यांच्या घरासमोरच चंद्रदीप नरके यांच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष केला. अरूण नरके यांनी महाविकास आघाडीला समर्थन दिल्यामुळे मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांनी चंद्रदीप नरके यांच्या विजयानंतर अरुण नरकेघरात एकटेच असल्याचे पाहून, निकाला दिवशी मध्यरात्री त्यांच्या घरासमोर फटाक्यांच्या माळा लावल्या व गुलालाची उधळण केली. सीसीटिव्ही असतानाही असा निर्लज्जपणाचा प्रकार बिनधास्त सुरू होता. फटाक्यांमुळे अरुण नरके यांच्या दारातील तुळशीसह अन्य वनस्पतींची नासधूस झाली. शिवाय चारचाकी वाहनांवरही हे टोळके नाचल्याने वाहनाचेही नुकसान झाले आहे.

दरम्यान आमदार म्हणून निवडून येताच चंद्रदीप नरकेंच्या विजयाच्या उन्मादाचे हे व्हिडिओ सध्या समाज माध्यमांतून समोर येत आहेत. उन्माद करणाऱ्यांमध्ये चंद्रदीप नरके यांच्या मुलाचाही समावेश असल्याचे सीसीटीव्हीत दिसून येत असून, या गंभीर प्रकाराबाबत अरुण नरके यांच्या मुलांनी चंद्रदीप नरके यांच्याकडे स्पष्ट नाराजी व्यक्त केली. पण याबाबत चंद्रदीप नरके यांच्याकडून कसलीही दिलगिरी व्यक्त केली गेली नसल्याचीही माहिती मिळत आहे.

यापुर्वी 2009 मध्ये आपले जीवश्च मित्र दिवंगत आमदार पी.एन.पाटील यांच्याशी फारकत घेत अरुण नरके हे पुतणे चंद्रदीप नरके यांच्या पाठीशी राहिले. त्यानंतर चंद्रदीप नरके यांना दोन वेळा आमदार करण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. पण यंदा विधानसभा निवडणुकीत अरुण नरके हे महाविकास आघाडीच्या बाजूने राहिले. 82 वर्षाचे असल्याने ते प्रचारात सहभागी झाले नव्हते. या निवडणूकीत करवीर विधानसभा मतदारसंघातून चंद्रदीप नरके हे अवघ्या 1976 अशा मोजक्या मतांनी निवडून आले.

निकाला दिवशी अरुण नरके हे घरी एकटेच असल्याची संधी साधत, मध्यरात्री एकच्या सुमारास चंद्रदीप नरके यांचा मुलगा आपल्या मित्रांसह अरुण नरके यांच्या घरात घुसले. त्यांनी गुलालाची पोती त्यांच्या पायऱ्यांसह दारावर ओतली. त्यानंतर, फटाक्यांच्या माळा पेटवून त्यांच्या दारावर टाकल्या. यामध्ये दारातील तुळशीसह इतर झाडे पेटली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. अरुण नरके यांच्या गाड्यांवरही नाचून नासधूस केल्याचे समोर आले आहे. चंद्रदीप नरके व त्यांच्या मुलाचा हा उन्मादपणा अरुण नरके यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे.

सतेज पाटील यांच्यासोबत गेल्याचा राग

लोकसभा निवडणूकीपासून अरुण नरके, ‘गोकुळ’चे संचालक डॉ. चेतन नरके हे आमदार सतेज पाटील यांच्यासोबत गेले. त्यांनी खासदार शाहू महाराज छत्रपती यांचा प्रचार केल्याचा राग त्यांच्या मनात असल्याचे बोलले जात आहे. त्यातूनच निकालानंतर ‘एका एकाला बघून घेतो,सोडणार नाही’ असे चंद्रदीप नरके मोठ्या ओरडत होते. सध्या या उन्मादपणाची शिवाजीपेठेसह ‘करवीर’ मतदारसंघात तीव्र नाराजीचा सूर उमटू लागल्याचे दिसून येत आहे.