संविधान हाती घेत प्रियंका गांधी यांची लोकसभेत खासदारकीची शपथ

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली. केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यानंतर त्यांनी आज संसद सदस्य म्हणून शपथ घेतली.

प्रियंका गांधी यांनी शपथ घेतली त्यावेळी त्यांचे बंधु लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी आणि आई काँग्रेस नेत्या सोनिया गांधी हे उपस्थित होते. तसेच प्रियंका गांधी यांचा मुलगा रेहान वाड्रा आणि मुलगी मिराया वाड्राहीही उपस्थित होते.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रियंका गांधी यांचे नाव पुकारताच प्रियंका गांधी या हातात संविधान घेऊन पोहोचल्या. संविधान हाती घेत प्रियंका यांनी खासदारकीची शपथ घेतली.

देशातील जे महत्त्वाचे मुद्दे आहे, ते मांडण्यास माझे प्राधान्य असेल. देश आणि पक्षासाठी लढणार, अशी प्रतिक्रिया प्रियंका गांधी यांनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना दिली. आपण राहुल गांधी आणि काँग्रेस लोकसभेत आणखी बळकट करू. संविधानासाठी ही लढाई आहे आणि त्यालाही बळकटी मिळेल. आमच्यासाठी संविधानच्या वर काहीही नाही. सविंधानाच्या रक्षणासाठी आम्ही लढतोय आणि लढत राहणार, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही आनंदी आहोत आणि अभिमान आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या. आम्हाला संसदेत एक नवी शक्ती आणि ऊर्जा मिळाली आहे. प्रियंका यांना जनतेच्या प्रश्नांची जाण आहे, विशेष करून महिलांचे मुद्दे. याचा फायदा पक्षाला, महिलांना आणि देशाला होईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली.