मिंधेंनी यापुढे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊ नये; संजय राऊत कडाडले

भारतीय जनता पक्षाच्या हायकमांडने आदेश देताच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडले. एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गोडवे गाताना ते मुख्यमंत्री पदाबाबत घेतील तो निर्णय आपल्याला मान्य असेल. भाजप नेतृत्व सांगेल ते ऐकेन, असे म्हणाले. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंधेंवर जोरदार टीका केली. आपल्या पक्षाचा निर्णय घेण्याचा अधिकार दिल्लीतील मोदी-शहांना देणाऱ्या मिंधेंनी यापुढे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊ नये, अशा शब्दात संजय राऊत यांनी मिंधेंना ठणकावले.

दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, जे स्वत:ला शिवसेना समजतात, मानतात त्यांनी त्यांच्या पक्षाचा निर्णय घेण्याचा अधिकार जर दिल्लीतील मोदी-शहांना दिले असतील तर त्यांनी यापुढे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊ नये. जी शिवसेना निवडणूक आयोगाने आणि मोदी-शहांनी तुमच्या हातात दिली त्या संदर्भातील निर्णय घेण्याचा अधिकार मोदी-शहांना देत असाल तर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्वाभिमान, महाराष्ट्राचा अभिमान असे शब्द त्यांनी न वापरलेले बरे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

शिंदेंचे मुख्यमंत्रीपद जाताच त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी एक भावूक पोस्ट केली. सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व ठेवते, भल्याभल्यांना मोहात पाडते, याला एकनाथ शिंदे अपवाद, अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली. यावरही राऊत यांनी भाष्य केले. अडीच वर्षापूर्वी मुख्यमंत्रीपदामुळे कसे मोहात पडले हे आम्ही पाहिलेले आहे. मुख्यमंत्रीपदासाठी हा मोह किती टोकाला गेला होता हे महाराष्ट्राने पाहिले आहे, असा घणाघात राऊत यांनी केला.

महाविकास आघाडीतून शिवसेना वेगळी होणार का प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, अजिबात नाही. आताच निकाल लागलेले असून या संदर्भात सगळ्याच पक्षाचे चिंतन, मंथन, अभ्यास सुरू आहे. तिन्ही पक्षाला धक्का बसलेला आहे. याची कारणे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहे. कारणांची दिशा पाहिली तरी ईव्हीएमच्या दिशेने जाते. ज्या पद्धतीने पैसे वापरले त्या दिशेने जाते. त्यामुळे आम्हाला तिघांना एकत्र बसून चर्चा करावी लागेल.

राहुल गांधी यांच्याशी काल आम्ही चर्चा केली. काही कार्यकर्त्यांची भूमिका असते. निवडणुकीत पराभव झाला की त्यांना असे वाटते की आपण स्वतंत्रपणे लढायला पाहिजे होते. पण आता मुंबई महापालिकेसह 14 महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्या संदर्भात निर्णय घ्यावा लागतो. अजून विधानसभा, लोकसभेला 5 वर्ष आहेत. राजकारणामध्ये इतक्या घाईने निर्णय घ्यायचे नसतात. लोकसभा एकत्र लढल्याने फायदा झाला, हे विसरता येणार नाही, असे राऊत म्हणाले.

वाटलं होतं तसंच घडलं, कमळाबाईनं वापरून सोडलं; शिंदे म्हणतात, भाजप सांगेल ते ऐकेन! दिल्लीपुढे मान झुकवली!!

विधानसभेला दुर्दैवाने आम्हाला यश मिळालेले नाही. अपयशामागची कारणे आम्ही एकत्र बसून शोधू. ती कारणे माहिती असले तरी एकत्र बसावे लागेल. त्यामुळे स्वतंत्र लढण्याच्या ज्या भूमिका असतात त्या कार्यकर्त्यांच्या व्यक्तिगत भावना असतात. जिंकलेले उमेदवार असे म्हणणार नाही, जे पराभूत झाले त्यांना वाटते की आमच्या पराभवामागे नक्की काय कारण आहे, असेही राऊत यावेळी म्हणाले.

इस्रायली टेक्नॉलॉजीद्वारे ईव्हीएममध्ये फेरफार; मविआची निकालाविरोधात रणनिती ठरली