झारखंडमध्ये श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती, लिव्ह इन पार्टनरने प्रेयसीचे 50 तुकडे करून जंगलात फेकले

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडाची झारखंडमध्ये पुनरावृत्ती झाली आहे. लिव्ह इन पार्टनरने प्रेयसीची हत्या करत मृतदेहाचे 50 तुकडे केले. त्यानंतर प्राण्यांना खाण्यासाठी मृतदेहाचे तुकडे जंगलात फेकले. मात्र भटक्या कुत्र्यामुळे सर्व घटना उघडकीस आली. यानंतर तपासाअंती पोलिसांनी आरोपी नरेश भेंगरा याला अटक केली आहे.

नरेश भेंगरा गेल्या काही वर्षांपासून खुंटी जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या तरुणीसोबत तामिळनाडूत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होता. काही दिवसांपूर्वी तो झारखंडला परत आला आणि त्याने दुसऱ्या महिलेसोबत विवाह केला. यानंतर पत्नीला झारखंडमध्ये ठेवून तो पुन्हा प्रेयसीकडे तामिळनाडूला परतला.

प्रेयसीला नरेशच्या विवाहाची माहिती नव्हती. ती त्याच्यावर खुंटीला परतण्यासाठी दबाव टाकत होती. अखेर 9 नोव्हेंबर रोजी प्रेयसीसोबत खुंटीला जायला निघाला. मात्र त्याने लग्न केले असल्याने तो तिला घरी घेऊन जाऊ शकत नव्हता. त्यामुळे त्याने एक कट रचला.

आरोपी महिलेला रिक्षाने आपल्या घराजवळ नेले. तेथे तिला वाट पाहण्यास सांगून आरोपी कुठेतरी निघून गेला. काही वेळाने धारदार हत्यारासह आरोपी परतला. त्यानंतर त्याने आधी प्रेयसीवर बलात्कार केला, मग ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर शरीराचे 45 ते 50 तुकटे करून जंगलात फेकले. यानंतर तो आपल्या घरी गेला.

हत्येच्या 15 दिवसांनंतर 24 नोव्हेंबर रोजी एक भटका कुत्रा जरियागड पोलीस ठाण्याअंर्तगत असलेल्या जोरदाग गावाजवळ मृदेहाचे काही तुकडे तोंडात घेऊन दिसला. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा शोध सुरू केला.

पोलिसांनी जंगलात शोध घेतला असता मृतदेहाचे तुकडे आणि तरुणीची बॅग सापडली. या बॅगेतील कागदपत्रांवरून पोलिसांनी तरुणीची ओळख पटवली. तपासादरम्यान तरुणी बेपत्ता असल्याची पोलिसांना माहिती मिळाली.

तरुणीने गावी आपल्या आईला ती गावी येत असून तिच्या लिव्ह इन पार्टनरसोबत राहणार असल्याचे सांगितले होते. मात्र ती परतलीच नाही. पोलिसांनी तरुणीच्या आईला बोलावून तिची मृतदेहाची ओळख पटवली. तरुणीच्या आईने नरेशवर संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत चौकशी केली त्याने हत्येची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास करत आहेत.