पुरातन स्थळी नमुने गोळा करत असताना मातीचा ढिगारा कोसळला, आयआयटीच्या विद्यार्थिनीचा दबून मृत्यू; प्राध्यापिका जखमी

गुजरातमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. लोथल येथील पुरातन स्थळी मातीचे नमुने गोळा करायला गेलेल्या पुरातत्व विभागाच्या सदस्यांवर मातीचा ढिगारा कोसळला. यात दिल्लीतील आयआयटीच्या एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर प्राध्यापिका गंभीर जखमी झाली आहे. जखमी प्राध्यापिकेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सुरभी वर्मा असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे, तर यामा दीक्षित असे जखमी महिला प्राध्यापिकेचे नाव आहे. संशोधनाच्या उद्देशाने माती गोळा करण्यासाठी लोथलच्या पुरातन स्थळावर पोहोचलेल्या टीमचा या दोघीही एक भाग होत्या. मात्र तेथे अचानक अपघात झाला आणि त्यांना आपला जीव गमवावा लागला.

अहमदाबादपासून 80 किलोमीटर अंतरावर असलेले लोथल हे हडप्पा संस्कृतीचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. आयआयटी गांधीनगर आणि आयआयटी दिल्लीचे चार सदस्यांचे पथक या लोथल येथे संशोधनासाठी नमुने गोळा करण्यासाठी गेले होते. यापैकी सुरभी वर्मा आणि यामा दीक्षित या मातीचे नमुने घेण्यासाठी 10 फूट खड्ड्यात उतरल्या होत्या.

मातीचे नमुने घेत असतानाच अचानक माती खचू लागली. यात सुरभी वर्मा आणि पुरातत्व विभागाच्या शास्त्रज्ञ यामा दीक्षित या अडकल्या. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दल आणि स्थानिक पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत सुरभीचा मृत्यू झाला होता. तर प्रोफेसर यामा दीक्षित यांना वाचवण्यात यश आले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, असे अहमदाबाद ग्रामीण एसपी ओमप्रकाश जाट यांनी सांगितले.