शेतात काबाडकष्ट करून शेतकऱ्यांनी भात पिकवला. पण अवकाळी पावसाने या भाताची अक्षरशः माती करून टाकली. उरलासुरला भात विकण्यासाठीदेखील मुरबाडमधील शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. खरेदी-विक्री संघाच्या भोंगळ कारभारामुळे अनेक शेतकऱ्यांना थंडीत कुडकुडत रात्र काढावी लागली. खरेदी-विक्री प्रक्रिया सुरळीत नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून पदाधिकारी व कर्मचाऱ्यांबरोबर बाचाबाचीही झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
शहापूर, मुरबाड तालुक्यात दरवर्षी पावसाळ्यात भाताचे पीक प्रामुख्याने घेण्यात येते. निसर्गाशी मुकाबला करून कसे बसे हे पीक हाता-तोंडाशी आले असतानाच यावर्षी अवकाळीने घात केला. शेतात पाणी साचल्यामुळे भात सडला. उरलेसुरले धान्य कुटुंबासाठी घरात ठेवून उर्वरित भात विकण्यासाठी मुरबाडमधील शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. सरकारच्या खरेदी-विक्री संघामार्फत हा भात विकत घेण्यात येतो. त्यासाठी शहापूर व मुरबाड तालुक्यात खरेदी-विक्री केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
ज्या शेतकऱ्यांना भात विकायचा आहे त्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागते. तसेच खरेदी-विक्री संघामार्फत टोकन दिले जाते. मुरबाडमधील भगवान भालेराव (विढे), बाळकृष्ण हरड (नारिवली), पुंडलिक हरणे (केदुर्ली) यांच्यासह हजारो शेतकऱ्यांनी भात खरेदीसाठी टोकन घेतले. मात्र या शेतकऱ्यांचा भात वेळेत न घेतल्यामुळे त्यांना मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात कडाक्याच्या थंडीमध्ये मुक्काम करावा लागत आहे. संपूर्ण रात्र या शेतकऱ्यांनी जागून काढली.
प्रक्रिया सोपी व जलद करा
खरेदी-विक्री केंद्रावर पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. काट्यावर वजन करणे, त्याची नोंद ठेवणे या कामासाठी बराचसा वेळ लागतो. त्यामुळे मुरबाडमधील अनेक शेतकऱ्यांची पदाधिकारी व कर्मचाऱ्यांबरोबर बाचाबाची झाली. व्यापाऱ्यांना टोकन दिले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये मात्र संताप निर्माण झाला आहे. या बाचाबाचीमुळे काही काळ वातावरण तंग झाले होते. भात खरेदी-विक्रीची प्रक्रिया सोपी व जलदगतीने करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.