मोदी सरकार आणि पेंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या सातत्याने दुर्लक्ष करण्यामुळे आणि रेल्वे अपघात गांभीर्याने न घेण्यामुळे रेल्वेच्या मालमत्तांचे कोटय़वधींचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे अपघातांमुळे एप्रिल 2019 ते मार्च 2024 या पाच वर्षांच्या कालावधीत रेल्वेच्या मालमत्तांचे तब्बल 313 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने आज लोकसभेत दिली.
नुकसान झालेल्या मालमत्तांमध्ये रेल्वेचे साहित्य, रोलिंग स्टॉक, ट्रक इत्यादींचा समावेश आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात याबाबतची माहिती दिली. पाच वर्षांत रेल्वे अपघातात सरकारी मालमत्तेचे किती आर्थिक नुकसान झाले याबाबत एस वेंकटेशन, के सुब्बारायन, पी. सी. गड्डीगौडर, सेव्हराज व्ही आणि बळवंतबसवंत वानखेडे या विविध पक्षांतील पाच आमदारांनी प्रश्न विचारला होता. रेल्वे अपघातांचे बळी ठरलेल्यांना ई-तिकीटच्या माध्यमातून आर्थिक नुकसानभरपाई देण्यात आल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. पर्यायी प्रवासी विमा योजनेअंतर्गत 22 दावे करण्यात आल्याचे ते म्हणाले. 1 नोव्हेंबर 2019 ते 31 ऑक्टोबर 2024 यादरम्यानचे हे दावे असल्याचे ते म्हणाले.
अपघात घटल्याचा दावा
गेल्या काही वर्षांमध्ये सुरक्षिततेचे नियम पाळल्यामुळे तसेच अनेक उपाययोजना राबवल्यामुळे अपघातांमध्ये घट झाल्याचा दावा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला. 2014-15 मध्ये रेल्वे अपघात 135 ने घटले तर 2023-24 मध्ये अपघातांचे प्रमाण 40 ने कमी झाल्याचे रेल्वे मंत्री म्हणाले.
रेल्वे ट्रकची योग्य देखभाल नाही, सिग्नल यंत्रणेची वेळोवेळी तपासणी न करणे, कालबाह्य पायाभूत सुविधा, चुकीच्या ट्रक अलाइनमेंट, अकार्यक्षम सिग्नल यंत्रणात, पूल आणि बोगद्यांमध्ये ट्रकची योग्य देखभाल नाही, इत्यादी कारणांमुळे रेल्वे अपघात घडत असल्याचे समोर आले आहे.
पाच वर्षांत 200 मोठे रेल्वे अपघात झाले
गेल्या पाच वर्षांत दर महिन्याला सरासरी तीन रेल्वे अपघात होत असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले असून तब्बल 200 मोठे रेल्वे अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. रेल्वे रुळावरून डबे घसरून 145 रेल्वे अपघात झाले आहेत. 2024-25 या वर्षात पहिल्या पाच महिन्यांत 18 अपघात घडले आहेत. मध्य प्रदेशातील नीमच येथील कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकारांतर्गत ही माहिती समोर आली आहे.