अदानींवरील आरोपांवरून विरोधकांचा संसदेत हंगामा, दोन्ही सभागृहांचे कामकाज गदारोळात बंद

उद्योजक गौतम अदानी यांच्याविरुद्ध लाचखोरीप्रकरणी अमेरिकेतील कोर्टाने अटक वॉरंट बजावला असून यावर चर्चा करण्याची मागणी लावून धरत विरोधकांनी आज संसदेच्या दोन्ही सभागृहांत हंगामा केला. या प्रकरणी सखोल चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती नेमण्याची मागणीही विरोधकांनी केली. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत सरकारने कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रचंड गदारोळ झाला आणि दोन्ही सभागृहांचे कामकाज गदारोळातच दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

अदानी यांना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उचलून धरली. संपूर्ण मोदानी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती नेमावी. तसेच अदानी लाचखोरी प्रकरणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योजक गौतम अदानी यांच्यातील संबंध उघड झाले आहेत. याबाबत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेससह सर्वच विरोधकांनी लावून धरली. यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. हा गदारोळ सुरू असतानाच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. परंतु विरोधक आणखी आक्रमक झाले आणि गदारोळातच दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करण्यात आले. दरम्यान, विरोधकांनी उत्तर प्रदेशातील संभलमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या मुद्दय़ावरूनही गदारोळ केला.

आरोपांमुळे अदानी समूहाने गमावले 55 अब्ज डॉलर्स

अदानी समुहाने आपल्या संचालकांवर झालेले लाचखोरीचे आरोप फेटाळले आहेत. तसेच अमेरिकेच्या न्याय विभागाने आरोप केल्यापासून समूहाने त्याच्या 11 सूचिबद्ध पंपन्यांच्या बाजार भांडवलात सुमारे 55 अब्ज डॉलर्स गमावले आहेत, असेही अदानी समूहाने स्पष्ट केले आहे. गौतम अदानी, सागर अदानी आणि विनीत जैन यांच्यावर यूएस करप्ट फॉरेन प्रॅक्टिसेस अॅक्टचे उल्लंघन झाल्याचा आरोप चुकीचा आहे, असा अदानी समूहाचा दावा आहे. अदानी ग्रीन एनर्जीने स्टॉक एक्स्चेंजला लिहिलेल्या पत्रात याबाबतची माहिती दिली आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाच्या आरोपात केवळ अझूर आणि सिडीपीक्यू अधिकाऱयांवर लाचखोरीचा आरोप आहे. अदानी समूहाच्या अधिकाऱयांवर लाचखोरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप करणारे सर्व अहवाल खोटे आहेत. आरोपांमध्ये अदानी समूहाच्या अधिकाऱयांनी हिंदुस्थानी अधिकाऱयांना लाच दिल्याचा कोणताही पुरावा नाही, असा दावा अदानी समूहाने केला आहे.

अदानी तुरुंगात असायला हवेत, त्यांना सरकार वाचवतेय

अमेरिकेतील लाचखोरीसारख्या गंभीर गुह्यात सरकार अदानींना वाचवतेय, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब झाल्यानंतर राहुल गांधी यांनी संसदेबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. लहान-सहान गुह्यांसाठी शेकडो लोक तुरुंगात आहेत. मग अदानींनी तर हजारो कोटींचा घोटाळा केला आहे, मग ते तुरुंगात का नाहीत, ते तुरुंगात असायला हवेत, असे राहुल गांधी म्हणाले. अदानी समूहाने आरोप फेटाळून लावल्याचे पत्रकारांनी सांगितले असता, साहजिकच अदानी काय आरोप स्वीकारणार आहेत का? ते आरोप फेटाळणारच. मुद्दा हा आहे की, त्यांना अटक झाली पाहिजे आणि या प्रकरणाशी निगडित इतरांनाही ताब्यात घेतले पाहिजे. अमेरिकेच्या न्यायालयात त्यांच्यावर हजारो कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी आरोप ठेवण्यात आले आहेत, खरेतर ते तुरुंगात असायला हवेत, परंतु सरकार त्यांना वाचवत आहे, असे राहुल गांधी म्हणाले.