वाटलं होतं तसंच घडलं, कमळाबाईनं वापरून सोडलं; शिंदे म्हणतात, भाजप सांगेल ते ऐकेन! दिल्लीपुढे मान झुकवली!!

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा विराजमान होण्याची स्वप्ने पाहणाऱया एकनाथ शिंदे यांनी अखेर आज दिल्लीपुढे मान झुकवली. वाटलं होतं तसंच घडलं, कमळाबाईनं शिंदे यांना वापरून सोडलं. भारतीय जनता पक्षाच्या हायकमांडचा आदेश शिरसावंद्य म्हणत शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडले. पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गोडवे गाताना ते मुख्यमंत्री पदाबाबत घेतील तो निर्णय आपल्याला मान्य असेल. भाजप नेतृत्व सांगेल ते ऐकेन, असे शिंदे म्हणाले. या संपूर्ण पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांचा नामोल्लेख मात्र त्यांनी टाळला. दरम्यान, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल याचा फैसला उद्या दिल्लीत होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री आमचाच होणार असा दावा महायुतीमधील भाजप आणि मिंधे गट गेल्या तीन दिवसांपासून करत आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते जोरदार मागणी करत आहेत, परंतु अद्याप महायुतीचा मुख्यमंत्री ठरलेला नाही. आज एकनाथ शिंदे यांनी सस्पेन्स निर्माण करत ठाण्यातील आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद बोलवली. शिंदे काहीतरी मोठा निर्णय घेतील अशी मीडियात चर्चा होती, परंतु अर्धा तासाच्या या पत्रकार परिषदेत त्यांनी कमळाबाई आणि दिल्लीश्वरांसमोर सपशेल शरणागती पत्करल्याचे स्पष्ट झाले. शिंदेंनी मोदी-शहांवर स्तुतिसुमने उधळली. गेली सव्वादोन वर्षे आपल्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल आभार मानले, पण सोबत राहिलेल्या फडणवीसांबद्दल शब्दही काढला नाही.

मोदींनी महाराष्ट्राला किती निधी दिला, अमित शहा पाठीशी कसे उभे राहिले, मला काय मिळाले यापेक्षा महाराष्ट्राला काय मिळणार हे महत्त्वाचे आहे असे निरोपाचे बोलच एकनाथ शिंदे यांच्या तोंडी होते. माझ्यामुळे सत्तास्थापनेचे घोडे अडणार नाही. भाजप जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे. यासंदर्भात आपले फोनवरून पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्याशीही बोलणे झाले. दोघांनाही आपण आपल्या भावना कळवल्या, असा दावाही शिंदे यांनी यावेळी केला.

आज दिल्लीतील बैठकीत फैसला

देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाबाबत प्रसारमाध्यमांनी विचारले. त्यावर ते म्हणाले की, उद्या दिल्लीत महायुतीचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. त्या बैठकीला तीनही पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी होणाऱया बैठकीतच मुख्यमंत्री पदाबाबत अंतिम निर्णय होईल, असे फडणवीस यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे असे माध्यमांनी विचारले असता काहीच उत्तर न देता फडणवीस यांनी केवळ हात जोडले.

बॅनरबाजी, बातम्यांची पेरणी, आटापिटा वाया गेला

मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळावे यासाठी मिंधे गटाने खूप आटापिटा केला. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी राज्यातील जनतेची इच्छा असल्याचे दाखवण्यासाठी वातावरण निर्मिती केली गेली. ठिकठिकाणी बॅनरबाजी केली गेली. लाडक्या बहिणींचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा असल्याचे दाखवण्यासाठी मीडियाला हाताशी धरले गेले. बातम्या पेरल्या गेल्या. भाजपने शिंदे यांना पर्याय दिल्याच्या बातम्याही मीडियाने चालवल्या. मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांनी तर राज्यातील देवीदेवतांना गाऱहाणीही घातली, परंतु तो सर्व आटापिटा आज वाया गेला.

हसते चेहेरे के पिछे दर्द छिपा होता है

पत्रकार परिषदेत ‘जीवन में असली उडान बाकी है.. अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन, अभी तो सारा आसमान बाकी है’ असा डायलॉग मिंधेंनी मारला. त्यावरून नेटकऱयांनी मिंधेंची फिरकी घेतली. ‘हसते चेहरे के पिछे दर्द छिपा होता है, जो बात लफ्ज न कह पाये वो आँखों से बया होता है’ हा शेर नेटकऱयांनी पेश केला.

अजित पवार गट 12 मंत्रीपदांसाठी आग्रही

महायुतीमध्ये 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला निश्चित आहे. महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाची कमाल मर्यादा 43 आहे. हे लक्षात घेता प्रत्येक 6-7 आमदारांमागे एक मंत्रीपद असे वाटप तिन्ही पक्षांत होईल. दरम्यान, 9 कॅबिनेट, 3 राज्यमंत्री अशी 12 मंत्रीपदे मिळावीत असा अजितदादा गटाचा आग्रह आहे.

बिहार फॉर्म्युला फेटाळला, फडणवीसांसाठी भाजप आग्रही

भारतीय जनता पक्षाने बिहारमध्ये सत्ता मिळवण्यासाठी अधिक जागा मिळवूनही जनता दल युनायटेड पक्षाचे नेते नितीश कुमार यांच्या गळय़ात मुख्यमंत्री पदाची माळ घातली होती. तोच बिहार फॉर्म्युला भाजप महाराष्ट्रात राबवेल आणि एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवेल अशी हवा मिंधे गटाकडून निकालानंतर निर्माण केली गेली होती, परंतु भाजपने बिहार फॉर्म्युला फेटाळला. भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत आणि अजित पवार गटाचाही पाठिंबा आहे. त्यामुळे शिंदेंची भाजपला गरज उरलेली नाही आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी भाजप आग्रही आहे.

भाजपचे दबावतंत्र

एकनाथ शिंदे यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री पदासाठी भाजपला पाठिंबा जाहीर करावा यामागे भाजपचे दबावतंत्र असल्याचे सांगितले जात आहे. कारण त्यानंतर मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये भाजपबद्दल संताप निर्माण होऊन महायुती बिघडू नये यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी शिंदेंचा कर्तबगार नेता असा उल्लेख करत आभार व्यक्त केले.