ईव्हीएम नको मतपत्रिकेवर निवडणुका घ्या, काँग्रेसची सह्यांची राज्यव्यापी मोहीम

महाराष्ट्र विधानसभेच्या निकालावर कोणाचाही विश्वास बसत नाही. या निकालात काहीतरी गडबड असल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने राज्यभर सह्यांची मोहीम सुरू करणार आहे.

मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी जनआंदोलन उभे करण्याची घोषणा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. महाराष्ट्रात लवकरच या मागणीसाठी सह्यांची मोहीम होईल, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

आपण एकाला दिलेले मत दुसऱयालाच जात असल्याची भावना जनतेत आहे. जनतेच्या भावनांचा आदर करत राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश व निवडणूक आयोगालाही पत्र पाठवण्यात येतील असे नाना पटोले म्हणाले.

भाजपला व महायुतीला पाशवी बहुमत मिळाले. निकालाला चार दिवस झाले तरी मुख्यमंत्री निश्चित होत नाही, सरकारही स्थापन होत नाही. राज्यात शेतकऱयांच्या समस्या आहेत. बेरोजगारी, महागाई, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच, पण भाजप व महायुतीला जनतेची चिंता नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याचा निर्णय जोपर्यंत ‘मित्र’ घेत नाही, तोपर्यंत सरकार व मुख्यमंत्री होणार नाही. अडीच वर्षांत निम्मी मुंबई व महाराष्ट्र मित्राला विकला आहे. यापुढेही महाराष्ट्र विकण्याचे काम हे सरकार करेल. त्यामुळे ‘मित्राचा’ आदेश येताच मुख्यमंत्री व सरकार बनेल असा टोला नाना पटोले यांनी मारला.