पवईत पायलट तरुणीची आत्महत्या

एका विमान कंपनीत कमर्शियल पायलट असलेल्या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तिच्या मित्राला पवई पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

मृत तरुणी ही एका विमान कंपनीमध्ये कमर्शियल पायलट म्हणून काम करत होती. ती गेल्या वर्षांपासून ती मुंबईत राहत होती. तसेच ती 20 दिवसांपूर्वी दिवाळी सणासाठी तिच्या घरीदेखील गेली होती. गेल्या आठवडय़ात तरुणीने गळफास घेतला. त्यानंतर तिला अंधेरी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

याची माहिती समजताच तरुणीचे कुटुंबीय मुंबईत आले. मुंबईत आल्यावर त्याने तरुणीच्या मित्राची भेट घेतली. दोन वर्षांपूर्वी तिची अटक तरुणासोबत ओळख झाली होती. ओळखीनंतर त्यांच्यात मैत्री वाढली. तरुणीला मांसाहार आवडत होता. त्याला तो विरोध करत असायचा. त्यावरून त्यांच्यात वाद होत होते. गेल्या आठवडय़ात अटक तरुण हा तिच्या घरी राहायला गेला होता. तो दिल्लीला गेला तेव्हा तरुणीने त्याला आत्महत्या करत असल्याचे सांगितले. त्यामुळे तो पुन्हा परत आल्याचे समजते. त्या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होत असायचे. त्यामुळे ती सतत नैराश्यात असायची. तरुणीच्या कुटुंबीयांनी पवई पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून एकाला अटक केली.