हिंदुस्थानच्या गोलंदाजीचे प्रमुख अस्त्र जसप्रीत बुमराने आयसीसी कसोटी क्रमवारीत पुन्हा एकदा ‘नंबर वन’चे सिंहासन काबीज केलेय. हिंदुस्थान व ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या पहिल्या कसोटीनंतर आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीत बुमराने अव्वल स्थान पटकावले आहे.
बुमराने पर्थ कसोटीत चमकदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाला मागे टाकलं. बॉर्डर- गावसकर मालिकेतील पहिल्या सामन्यात बुमराने 8 विकेट घेत ‘सामनावीरा’चा बहुमान मिळविला होता. त्याने या कामगिरीच्या जोरावर कसोटी क्रमवारीत दोन स्थानांनी झेप घेतली आणि रबाडासह ऑस्ट्रेलियाच्या जॉश हेझलवूड यांना मागे टाकून कसोटी क्रमवारीत पुन्हा एका ‘नंबर वन’च्या सिंहासनावर विराजमान झाला. इंग्लंडविरुद्ध या वर्षी फेब्रुवारीमध्ये नऊ विकेट घेत बुमराने प्रथमच अव्वल स्थान गाठले आणि त्यानंतर ऑक्टोबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या मालिकेनंतर त्याने पुन्हा अव्वल स्थान गाठले, मात्र यानंतर रबाडाने त्याला मागे टाकले होते.
जैसवाल कारकीर्दीतील सर्वोत्तम स्थानी
टीम इंडियाचा नव्या दमाचा सलामीवीर यशस्वी जैसवालने आयसीसी कसोटीच्या फलंदाजी क्रमवारीत कारकीर्दीतील सर्वोत्तम दुसऱया स्थानी झेप घेतलीय. पर्थ कसोटीतील शतकाच्या जोरावर त्याने ही क्रमवारीत झेप घेतली. जो रुट 903 गुणांसह पहिल्या स्थानी आहे, तर जैसवालच्या खात्यात 825 गुण जमा झाले आहेत. जैसवाल दुसऱया स्थानी गेल्याने न्यूझीलंडच्या केन विल्यमसनला एका स्थानाचा नुकसान झाला आहे. तो आता 804 रेटिंगसह तिसऱया स्थानावर घसरलाय, तर इंग्लंडचा हॅरी ब्रुक तिसऱया स्थानावरून चौथ्या स्थानी पोहोचलाय.