आपल्या 15 कसोटींच्या छोटय़ाशा कारकीर्दीतच चार शतके झळकावणारा हिंदुस्थानचा युवा धडाकेबाज सलामीवीर यशस्वी जैसवाल कसोटी क्रिकेटमध्ये 40 पेक्षा अधिक शतके ठोकेल आणि अनेक विक्रमांनाही मोडीत काढेल, असा विश्वास ऑस्ट्रेलियन आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने व्यक्त केला आहे.
पर्थ कसोटीत 161 धावांची खेळी करत तिसऱया डावात हिंदुस्थानला 487 धावांचा डोंगर उभा करून देण्यात यशस्वी जैसवालचा सिंहाचा वाटा होता. ऑस्ट्रेलियन भूमीवर पाऊल पडताच विराटचा वारसदार आल्याची चर्चा सुरू झाली होती. या मालिकेत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना विराट नव्हे तर यशस्वीकडून धोका असल्याचाही इशारा देण्यात आला होता आणि तो इशारा यशस्वीने खरा करून दाखवला आहे.
आज हिंदुस्थानी संघात कर्णधार रोहित शर्मा, ऋषभ पंत, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहबरोबर यशस्वी जैसवालचेही स्थान पक्के आहे. अन्य खेळाडू कधी आत तर कधी बाहेर असतात. यशस्वीच्या पर्थ शतकी खेळीवर अनेक ऑस्ट्रेलियन्स क्रिकेटपटू फिदा झाले आहेत. यात मॅक्सवेलचेही नावे आलेय. त्याने एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत यशस्वीवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला आहे. तो असा फलंदाज आहे, जो कोणत्याही स्थितीत आपली अद्भुत क्षमता दाखवू शकतो. पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर दुसऱया डावात केलेल्या धमाक्यामुळे त्याचे फलंदाजीतले कौशल्य अवघ्या जगाने पाहिलेय. त्याने वैविध्यपूर्ण फटके मारले, पण त्याचबरोबर त्याने काही चेंडू सोडले आणि काही चेंडूंना बॅकफूटवर जाऊन खेळले, हे खूप महत्त्वाचे होते. त्याचा फुटवर्क लाजवाब आहे. असं वाटतं त्यात कोणतीच कमतरता नाहीय. तो आखूड टप्प्याच्या चेंडूंनाही सहज खेळतो आणि ड्राइव्ह लगावतो. फिरकीला आत्मविश्वासाने खेळतो आणि तो दबावातूनही मार्ग काढू शकतो. फक्त ऑस्ट्रेलियाने त्याला बाद करण्याचा फॉर्म्युला शोधला तर हिंदुस्थान अडचणीत येईल, असेही मॅक्सवेल म्हणाला.