ऑनलाइन आर्थिक फसवणूक करणाऱया गुन्हेगारांना विविध बँक खाती पुरविणाऱया एका आरोपीला दक्षिण प्रादेशिक सायबर पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. अटक केलेला आरोपी बँक खाती पुरविण्याबरोबर फसवणुकीची रक्कम काढून ती दुबईला पाठविण्याचे काम करत होता.
कुलाबा येथे राहणाऱया एका नागरिकाला विवेक (नाव बदललेले) यांना सायबर भामटय़ांनी संपर्क साधला व स्टॉक मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याची ऑफर दिली. मग व्हॉट्सअॅप क्रमांक व एक लिंक पाठवून शेअर ट्रेडिंग करण्याची बतावणी केली. गुंतवणूक केल्यास हमखास चांगला परतावा मिळेल असे आमिष त्यांनी दाखवले. या आमिषाला बळी पडत विवेक यांनी आरोपी सांगतील त्या बँक खात्यामध्ये तब्बल 11 कोटी 16 लाख लाख 61 हजार इतकी रक्कम पाठवून दिली. दरम्यान, आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच विवेक यांनी लगेच पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर दक्षिण प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक सुयेश भोये, सपोनि सचिन त्रिमुखे व पथकाने तपास सुरू केला. विवेक यांनी विविध बँक खात्यांवर 22 वेळा पैसे पाठवले होते. त्यामुळे आयसीआयसीआय व आयडीएफसी बॅंक खात्याची चौकशी करत असताना आयडीएफसीच्या एका बँक खात्यातून एका महिलेने सहा लाख रुपये धनादेशाद्वारे काढल्याचे व त्यावेळी तिने पॅनकार्ड दिल्याचे आढळून आले. त्यानुसार पथकाने त्या महिलेचा शोध घेऊन तिच्याकडे चौकशी केली असता तिने पैफ मन्सुरी (31) याच्या सांगण्यावरून पैसे काढल्याचे तिने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी पैफचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.
परदेशात पैसे पाठवायचा
कैफला ताब्यात घेतले तेव्हा त्याच्याजवळ पाच डेबिट कार्ड मिळून आली. त्या पाच बँक खात्यांमध्ये 44 लाख रुपये वळते झाल्याचे आढळून आले. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने अनेक बँक खाती प्रवेशित बसलेल्या आरोपींना उघडून दिल्याचे व फसवणुकीची रक्कम त्याने दुबईला पाठविल्याचे आढळून आले. पोलिसांनी 33 विविध बँक खात्यांची डेबिट कार्ड तसेच 12 वेगवेगळय़ा खातेदारांचे धनादेश मिळून आले. पोलीस अधिक तपास करीत आहेत.