उत्तर प्रदेशच्या लखनौ येथे झालेल्या 17 वर्षांखालील राष्ट्रीय शालेय गेम्सच्या ऍथलेटिक्समध्ये ठाण्याच्या शौर्या अंबुरेने सुवर्ण कामगिरी केली. मुलींच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत शौर्याने 12.16 सेकंद अशी विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. लखनौ येथे आयोजित एसजीएफआय चॅम्पियनशिप 2024 या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धैत देशातील आयसीएसई, सीबीएसई आणि राज्य शैक्षणिक मंडळातील राष्ट्रीय स्तरावरील अव्वल खेळाडूंनी सहभाग घेतला होता. 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत ठाण्याच्या युनिव्हर्सल हायस्कूलची विद्यार्थिनी शौर्या अंबुरेने चमकदार कामगिरी केली. तिने 12.16 सेकंदात ही स्पर्धा लिलया पार करत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. याचबरोबर 17 वर्षांखालील राष्ट्रीय पातळीवरील जलद धावपटू म्हणूनही शौर्याच्या नावाची नोंद झाली.