मुलाला शाळेत सोडायला जाणाऱया महिलेच्या दुचाकीला भरधाव डंपरने धडक दिल्याने त्यात मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कुर्ला येथील नेहरू नगरात घडली. चेंबूरच्या इंदिरा नगर येथे राहणाऱया कालुराम सिंगाडिया यांची पत्नी कविता (32) या त्यांचा मुलगा प्रवीण (12) याला शाळेत सोडायला नेहमी त्यांच्या ऑक्टिव्हा दुचाकीवरून जायच्या. त्याप्रमाणे मंगळवारी सकाळीदेखील नेहरू नगर येथील केदारनाथ विद्या प्रसाधिनी इंग्लिश शाळेत प्रवीणला सोडण्यासाठी कविता मुलांसोबत दुचाकीवरून चालल्या होत्या. सकाळी पावणेसातच्या सुमारास एस.जी. बर्वे मार्गावरील महेश हॉटेलसमोर त्यांच्या दुचाकीला भरधाव डंपरने धडक दिली. या धडकेत कविता व प्रवीण गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ राजावाडी इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना दोघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी डंपर चालक रिझवान रेहमानविरोधात नेहरू नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.